नाशिक : शहरात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागात पार्क केलेल्या दोन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी पंचवटी व आडगाव पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हिरावाडीतील विशाल राजेंद्र अक्कर (रा.साई विश्व रो हाऊस,शर्मा मळा शिवकृपानगर) यांची अॅक्टीव्हा एमएच १५ एफवाय ५१०४ त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि.४) रात्री घडली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत. दुसरी घटना नांदूरनाका भागात घडली. गोदावरी पुलाजवळील मित्तलपार्क इमारतीत पार्क केलेली दुचाकी एमएच १५ सीपी ८५४६ चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार नरवडे करीत आहेत.