नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कर चुकवल्याच्या आरोपाखाली, डोलो ६५० टॅब्लेट तयार करणार्या बंगळुरूस्थित औषधी कंपनी मायक्रो लॅब्स लिमिटेडच्या परिसराची इन्कम टॅक्स विभागाने झडती घेतली. डोलो ६५० ही गोळी ताप आणि वेदना कमी करण्यासाठी कोविड १९ महामारी दरम्यान मोठ्या प्रमाणावर वापरली गेली. या कंपनीने कोरोनाच्या संकटामध्ये औषधांची प्रचंड विक्री करुन जबरदस्त कमाई केल्याचे सांगितले जात आहे.
याविषयी अधिक माहिती देत अधिकाऱ्यांनी सांगितले की, “आयकर विभाग शोधाचा भाग म्हणून कंपनीचे आर्थिक रेकॉर्ड आणि स्टेटमेंट तपासत आहे. छाप्याच्या तपशीलाबाबत विभागाकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी मालकांवर करचुकवेगिरीच्या संशयावरून विभागाने ही कारवाई केली आहे.” याबाबत अधिकृतरित्या माहिती जाहीर करण्यात आली नसली तरी मायक्रो लॅब्स लिमिटेड ही फार्मास्युटिकल उत्पादने आणि API चे उत्पादन आणि वितरण करण्यात गुंतलेली असल्याचे समोर आले आहे.
परदेशी व्यवसायाव्यतिरिक्त, कंपनीचे देशभरात १७ उत्पादन युनिट्स आहेत. सिक्कीम, पंजाब, तमिळनाडू, गोवा येथील युनिट्सवर प्रामुख्याने छापा मारण्यात आला आहे. Dolo – 650, Amlong, Lubrex, Diapride, Vildapride, Olmat, Avas, Tripride, Bactoclave, Tenepride-M आणि Arbitel ही त्याची प्रमुख फार्मा उत्पादने आहेत. कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, २०२० मध्ये कोविड महामारी सुरू झाल्यापासून, कंपनीने डोलो – ६५० च्या ३५० कोटीहून अधिक गोळ्या विकल्या आहेत आणि गेल्या एका वर्षात सुमारे ४०० कोटी रुपये कमावले आहेत. ही कमाई रेकॉर्ड ब्रेक आहे.
Income Tax Department Raid Medicine Company Dolo 650 Tablet Corona Fever