नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विनापरवाना पिस्तूल खरेदी विक्री प्रकरणात शहर गुन्हे शाखेच्या युनिट एक व दोनच्या पथकाने वेगवेगळया भागात केलेल्या कारवाईत दोघा विक्रेत्यांसह एका खरेदीदारास गजाआड केले आहे. या संशयितांच्या ताब्यातून किया कारसह दोन गावठी कट्टे आणि जीवंत काडतुसे असा सुमारे १३ लाख ६२ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पहिली कारवाई युनिट २ चे कर्मचारी गुलाब सोनार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे जेलरोड भागात करण्यात आली. पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहित उर्फ माल्या गोविंद डिंगम (रा.जेलरोड) हा ब्रम्हगिरी सोसायटी परिसरातील मनपाच्या सम्राट गार्डन भागात किया सेल्टॉस कारमधून गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.१४) याभागात सापळा लावण्यात आला होता. कार अडवून पोलिसांनी संशयिताची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेस गावठी कट्टा आणि पॅण्टच्या खिशात चार जीवंत काडतुसे मिळून आले. संशयितास अटक करीत पोलिसांनी त्याच्या ताब्यातून ३० हजार रूपये किमतीचा कट्टा,जीवंत काडतुसे आणि किया कार असा सुमारे १३ लाख ३१ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संशयित सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर उपनगर पोलिस ठाण्यात खून,खूनाचा प्रयत्न व गंभीर दुखापत असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गुलाब सोनार,राजेंद्र घुमरे,सुगन साबरे,नंदकुमार नांदुर्डीकर,प्रकाश भालेराव,संतोष ठाकूर,सुनिल आहेर,प्रशांत वालझाडे आदीच्या पथकाने केली.
तर दुसरी कारवाई घारपुरे घाट येथे कररण्यात आली. येथील पत्र्याच्या शेडजवळ दोन जण गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सापळा लावून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत अक्षय रंगनाथ सानप (२६ रा.भवानीपर्ल सोसा. कलानगर, दिंडोरीरोड) व गणेश राजेंद्र चव्हाण (२८ रा.टीबी हॉस्पिटल वसाहत,रिलायन्स पंपामागे,दिंडोरीरोड) यांना अटक करण्यात आली आहे. अक्षय सानप याच्या कमरेस देशी पिस्टल व तीन जीवंत काडतुसे मिळून आले होते. पोलिस तपासात संशयित चव्हाण याच्याकडून सानप याने तीस हजार रूपयात पिस्तूल खरेदी केल्याचे समोर आले असून दोघांविरूध्द शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन आणि आर्म अॅक्टनुसार सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विष्णू उगले,अमंलदार प्रदिप म्हसदे,प्रविण वाघमारे,विशाल देवरे,प्रशांत मरकड,शरद सोनवणे,महेश साळुंके,नाझिमखान पठाण व समाधान पवार आदींच्या पथकाने केली.