नाशिक ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कारची काच फोडून चोरट्यांनी सोन्याचांदीच्या दागिण्यांसह मोबाईल आणि आयपॅड असा सुमारे ९१ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्निल विजय बोरसे (रा.हरिओमनगर,कोपरी ठाणे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ठाणे येथील बोरसे कुटुंबिय रविवारी (दि.६) देवदर्शनासह शहरात पर्यटनानिमित्त आले होते. दुपारी देवदर्शन आटोपून बोरसे कुटूंबिय परतीच्या प्रवासा दरम्यान महामार्गावरील पांडवलेणी भागात असलेल्या बोटेनिकल गार्डन भागात गेले असता ही घटना घडली. महामार्गाच्या सर्व्हीस रोडवर एमएच ०४ केआर ६६७० ही रेनॉल्ड क्वीड कार पार्क करून कुटूंबिय गार्डन मध्ये गेले असता अज्ञात चोरट्यांनी खिडकीची काच फोडून मागील आसनावर ठेवलेली पर्स चोरून नेली. यापर्समध्ये सोनसाखळी,आंगठ्या,ब्रेसलेट,मोबाईल,आयपॅड असा सुमारे ९१ हजाराचा ऐवज होता. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.