नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वृध्द काकास साडूच्या मुलानेचा सव्वा लाखाचा ऑनलाईंन गंडा घातला आहे. फोन लावण्याच्या बहाण्याने काकाचा फोन घेऊन फोन पेच्या माध्यमातून बँक खात्यातील रक्कम आपल्या मित्राच्या खात्यात परस्पर वर्ग केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी नितीन बाबुलाल तांबट (६७ रा.रामवाडी,पंचवटी) यांनी तक्रार दाखल केली असून याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय केशव कासार (रा.हुडको कॉलनी,भुसावळ जि.जळगाव) असे संशयित भामट्याचे नाव आहे. संशयित हा तांबट यांच्या साडूचा मुलगा असून त्याने २ जुलै ते १ सप्टेंबर दरम्यान आपल्या काकाच्या घरी येवून हा उद्योग केला आहे. वृध्द काका मावशीस भेटण्याच्या निमित्ताने घरी येवून मला माझ्या मित्राला फोन करायचा आहे असे सांगून काकाचा मोबाईल आपल्या ताब्यात घेत असे मोबाईलवर बोलण्याचा बहाणा करून तसेच वृध्द काकाच्या वृध्दापणाचा फायदा उचलत त्याने काकाच्या स्टेट बँक खात्यातील रोकडवर डल्ला मारला आहे. संशयिताने फोन पे चा वापर करून काकाच्या बँक खात्यातील सुमारे १ लाख २५ हजाराची रोकड वेळोवेळी मित्र मिलींद सोनवणे याच्या बँक खात्यात वर्ग केली आहे. अचानक पैसे गायब होत असल्याने काकाने बँकेत धाव घेतल्याने ही बाब समोर आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पडोळकर करीत आहेत.