नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्टेट बँकेच्या दुर्गा गार्डन शाखेत बनावट नोटा असल्याचे सांगून भामट्यांनी ३१ हजार रूपयांची रोकड हातोहात लांबविली. संध्या गंगाधर चौधरी (५८ रा. जैन भवनजवळ,गोपाळनगर आर्टीलरी सेंटर रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून नाशिकरोड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौधरी या आपल्या आईला सोबत घेवून बुधवारी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दुर्गा गार्डन शाखेत गेल्या होत्या. आईच्या पेन्शन खात्यातून १ लाख १० हजार रूपयांची रोकड काढून मायलेकी मोजत असतांना ही घटना घडली. बँकेतच दोघा भामट्यांनी मायलेकींना गाठले. यावेळी त्यांनी बँकेत बनावट नोटांचा भरणा आला असून तुमच्याकडील रोकडमध्येही डुप्लीकेट नोटा असण्याची शक्यता वर्तविली. यावेळी तपासणीसाठी मायलेकींनी नोटांचे बंडल संशयिताकडे सोपविले असता भामट्यांनी मोजता मोजता ३१ हजार ५०० रूपयांची रोकड हातोहात लांबविली. अधिक तपास जमादार चंद्रकांत माळोदे करीत आहेत.