नाशिक : आडगाव म्हसरूळ लिंकरोडवरील निसर्ग हॉटेल समोर इर्टीका आणि अल्टो कारमध्ये झालेल्या अपघातात अल्टो कारचालक ठार झाला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात इर्टीका कार चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास शिवाजी गिरासे (४० रा.सिनर्जी हॉस्पिटल जवळ,गितानगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या इर्टीका चालकाचे नाव आहे. याप्रकरणी ऋषीकेश थेटे यांनी तक्रार दाखल केली आहे. थेटे यांचे मृत वडिल संजय भास्कर थेटे (४७ रा.उंबरखेड – पिंपळगाव ता.निफाड) हे बुधवारी (दि.२१) आपल्या अल्टो कारमधून एमएच १५ जीए ३६२१ प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. म्हसरूळ कडून आडगाव मेडिकल कॉलेज चौफुलीच्या दिशेने भरधाव येणा-या इर्टीका एमएच १५ एचक्यू ५६४४ कारने अल्टोकारला जोरदार धडक दिली होती. हा अपघात निसर्ग हॉटेल समोर झाला होता. या अपघातात थेटे गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू जाला. मुलगा ऋषीकेश थेटे याने दिलेल्या तक्रारीवरून आडगाव पोलिसात इर्टीका कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार बस्ते करीत आहेत.