किरकोळ कारणातून बेदम मारहाण करुन महाविद्यालयीन तरूणावर चाकू हल्ला, तरुण जखमी
नाशिक : लॅमरोड भागात किरकोळ कारणातून बेदम मारहाण करीत टोळक्याने महाविद्यालयीन तरूणावर चाकू हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत डोक्यात आणि हाताच्या पंज्यावर चाकूने वार करण्यात आल्याने युवक जखमी झाला असून याप्रकरणी चार जणांच्या टोळक्या विरोधात देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रथमेश सुनिल चव्हाण (३०),नाईद जाफरअली शेख (३२ रा.दोघे सौभाग्यनगर,दे.कॅम्प) व त्यांचे दोन साथीदार अशी संशयितांची नावे आहे. याप्रकरणी अभिषेक भरत झणकर (२१ मुळ रा.भरवीर ता.इगतपुरी हल्ली आरटी बेकरी समोर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. झनकर शुक्रवारी (दि.२३) दुपारच्या सुमारास भाटीया कॉलेज भागातील साहेबा हॉटेल समोर आपल्या मित्रांसमवेत उभा असतांना संशयितांनी त्यास आवाज देवून बोलावून घेतले. यावेळी तू आमच्याशी खुन्नस देवून बोलला असे म्हणत टोळक्याने त्यास शिवीगाळ केली. आमच्या नादाला लागू नकोस नाहीतर हात पाय तोडून गेम करू अशी धमकी देत टोळक्याने त्यास लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी चव्हाण नामक संशयिताने आपल्या कमरेस लावलेला धारदार सुरा काढून झणकर याच्या डोक्यावर आणि हाताच्या पंज्यावर वार केले. या घटनेत झणकर जखमी झाला असून अदिक तपास हवालदार गि-हे करीत आहेत.
३३ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून केली आत्महत्या
नाशिक : ३३ वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना भोसला मिलट्री स्कूल परिसरातील संत कबीरनगर भागात घडली. आत्रम उत्तम कसबे (रा.साईबाबा मंदिराजवळ,पाटकिनारी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कसबे यांनी शुक्रवारी (दि.२३) आपल्या राहत्या घरात कुणी नसतांना लहान मुलांसाठी पलंगास बांधलेल्या झोळीस गुंडाळून घेत गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. कसबे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. ही घटना सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली गोविंद साठे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक कमलाकर मोरे करीत आहेत.