नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड येथील फर्निचर उद्योजक शिरीष गुलाबराव सोनवणे (५६) यांचा मृतदेह मालेगाव येथे सापडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचे अपहरण करुन खून करण्यात आल्याचा संशय आहे. सोनवणे यांचा के. जे. मेहता हायस्कूल जवळ येथे स्वस्तिक फर्निचर कारखाना आहे. १० सप्टेंबर रोजी मालेगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या सायतार पाडे शिवारात पाट कॅनलमध्ये त्यांचा मृतदहे पाण्यात आढळून आला. त्यानंतर मालेगाव पोलिसांनी नाशिकरोड पोलिसांची संपर्क साधून याबाबत माहिती दिली. सोनवणे यांचे अपहरण कोणी केले. त्यांचा खून का करण्यात आला याबाबत पोलीस कसून शोध घेत आहे.
या घटनेबाबत समजलेली माहिती अशी की, ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास एका पांढऱ्या गाडीतून सोनवणे कोणास काही न सांगता निघून गेले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या कारखान्यात कामाला असलेला नोकर फिरोज लतीफ शेख याने या संदर्भात नाशिकरोड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी ती टीम तयार केल्या. त्यातील एक टीम शिंदे गाव टोल प्लाजा येथे तर दुसरी टीम घोटी टोल प्लाजा येथे रवाना केली होती. तर एक टीम स्थानिक स्तरावर तपास करत होती. नाशिकरोडचे पोलीस स्टेशन तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे यांनी पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशनला तपास यादी रवाना केल्या होत्या. त्यानंतर मालेगाव येथे मृतदेह सापडल्याची माहिती समोर आली. आता पोलिस या घटनेचा कसून तपास करीत आहे.