नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- देवळाली कॅम्प येथील नवीन बसस्थानकात मुलीच्या छेडखानीची आईकडे तक्रार केल्याने संतप्त तरूणाने परिचीत दांम्पत्यास बेदम मारहाण केली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. आकाश विलास गायखे (२३ रा.मुंजोबा गल्ली,संसरीगाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयित आणि दांम्पत्य एकमेकांचे परिचीत असून, तो मुलीला त्रास देत असल्याची माहिती पालक असलेल्या दांम्पत्याने संशयिताच्या आईला दिली होती. या घटेची दखल घेत संशयिताच्या आईने रविवारी सायंकाळी दांम्पत्यास नवीन बसस्थानकात चर्चा करण्यासाठी बोलविले असता ही घटना घडली. सदर दांम्पत्य आपल्या आईस भेटणार असल्याची माहिती मिळाल्याने संशयिताने बसस्थानक गाठून दांम्पत्यास शिवीगाळ करीत तुमचा बेत पाहतो अशी धमकी दिली. यावेळी संतप्त संशयिताने दोघांना लाथाबुक्यांनी मारहाण करीत पित्याच्या खांद्यावर ब्लेडने वार करीत दुखापत केली. अधिक तपास पोलिस नाईक भुजबळ करीत आहेत.