नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूर औद्योगीक वसाहतीत वेगवेगळय़ा दोन ठिकाणी महिलांचा पाठलाग करीत दुचाकीस्वारांनी महागडे मंगळसूत्र हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अंजना अजित राजपूत (रा.नाईस संकुल,एमआयडीसी सातपूर) या दुपारच्या सुमारास महात्मानगरकडून नाईस संकुलच्या दिशेने आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. आयटीआय सिग्नल परिसरातील पोस्ट ऑफिस समोरून त्या पायी जात असतांना समोरून आलेल्या हेल्मेटधारी दुचाकीस्वाराने त्यांच्या गळयातील सुमारे ४० हजार रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून नेले. श्रमिकनगर येथील अर्चना रविंद्र चांदोडे (रा.शिवशंकर राज अपा.) या सायंकाळच्या सुमारास दळण दळण्यासाठी परिसरातील गिरणीत जात असतांना ही घटना घडली होती. कुमावत बिल्डींग जवळून त्या दळण घेवून पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे ५८ हजार रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र ओरबाडून नेले. दुसरी घटना त्र्यंबकरोडवरील वर्दळीच्या आयटीआय सिग्नल भागात घडली. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास अनुक्रमे उपनिरीक्षक वाघ आणि उबाळे करीत आहेत.