नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वडाळोरडवरील जेएमसीटी कॉलेज भागात पेपर देवून महाविद्यालया बाहेर पडलेल्या तरूणास टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत तरूण जखमी झाले असून त्यांच्यावर परिसरातील गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहे. या मारहाणीची तक्रार नवाज इस्माईल खाटीक (२० रा.चांदणी चौक,ओझर) या युवकाने दिली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खाटीक जेएमसीटी महाविद्यालयात बी.फार्मसीचे शिक्षण घेत असून सोमवारी (दि.२९) त्याची परिक्षा होती. दुपारी पेपर सुटल्याने कॉलेज बाहेर पडला असता ही घटना घडली. प्रवेशद्वारापासून काही अंतरावरच संशयित आरशान व त्याच्या साथीदारांनी त्यास गाठले. यावेळी आरशान याने फरहान को मेरे खिलाफ क्यो भडकाया असा जाब विचारत शिवीगाळ करीत नवाज खाटीक याच्या तोंडावर बुक्का मारला. या घटनेत नवाज जखमी होताच उर्वरीत साथीदारांनी त्यास लाथाबुक्यांनी मारहाण केली. अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.