नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – व्दारका सर्कल भागात एस.टी. महामंडळाच्या वाहकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. अतिरिक्त भाडे घेतल्याच्या आरोप करीत प्रवासी महिलेच्या मुलाने आपल्या साथीदारांच्या मदतीने ही मारहाण केली. या मारहाणीची तक्रार वाहक वैभव ब्रम्हदेव खरात (रा.करमाळा जि.सोलापूर) यांनी दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरात एस.टी.महामंडळाच्या करमाळा आगारात वाहक पदी कार्यरत असून बुधवारी (दि.३१) रात्री ते सोलापूर नाशिक एमएच १४ बीटी २८२५ या बसवर सेवा बजावत असतांना ही घटना घडली. शिर्डी ते नाशिक प्रवासादरम्यान दोन महिला बसमध्ये बसल्या होत्या. या दोघी प्रवासी महिलांनी नाशिकरोड बसस्थानकाचे तिकीट घेतले होते. रात्री आठ वाजेच्या सुमारास बस नाशिकरोड स्थानकात पोहचली असता दोघींपैकी एक महिला आपल्या लहान मुलास घेवून उतरली. परंतू दुसरी महिला पुढील तिकीट न काढता प्रवास करीत होती. बस पुढे धावू लागली असता ही बाब निदर्शनास आल्याने वाहक खरात यांनी सदर अनोळखी महिलेस तिकीट काढण्यास भाग पाडल्याने ही घटना घडली. नाशिक पर्यंतच्या प्रवासाचे अतिरिक्त दहा रूपयांचे तिकीट फाडल्याने महिलेने बसप्रवासात वाद घातला. यावेळी महिलेने आपल्या मुलाशी संपर्क साधत त्यास व्दारका सर्कल भागात बोलावून घेतले. सदर मुलाने व त्याच्या दोन साथीदारांनी बसमध्ये चढून खरात यांना बसखाली खेचत लाथाबुक्यांनी मारहाण केली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गेंगजे करीत आहेत.