नाशिक – दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण झाल्याच्या घटना घडल्या आहे. त्यात एका मुलाचा व मुलीचा समावेश आहे. हे दोन्ही अंबड औद्योगीक वसाहतीत वेगवेगळय़ा भागात राहणारे आहे. या दोघांच्या कुटुंबियांनी शोध घेवूनही दोघे मिळून न आल्याने अपहरणाचा संशय व्यक्त होत आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात वेगवेगळे अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कामटवाडा परिसरात राहणारा मुलगा गेल्या मंगळवार (दि.९) पासून बेपत्ता आहे. घरात कुणास काही एक न सांगता तो निघून गेला असून त्याचे कुणी तरी अपहरण केल्याचा संशय कुटूंबियांनी वर्तविला आहे. तर चुंचाळे शिवारातील आंबेडकर नगर भागात राहणारी मुलगी गेल्या बुधवार (दि.३) पासून बेपत्ता आहे. दुपारच्या सुमारास सप्तशृंगी देवी मंदिर भागातून ती बेपत्ता झाली असून तिला कुणी तरी फुस लावून पळवून नेल्याचा संशय कुटुंबियांनी वर्तविला आहे. दोन्ही घटनांप्रकरणी पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलिस ठाण्यात वेगवेगळे अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास उपनिरीक्षक शेळके व पोलिस नाईक देशमुख करीत आहेत.