नाशिक : भारतनगर परिसरात इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून २५ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. भिमा नवसू दगडे (रा.बिलवंडी ता.दिंडोरी) असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दगडे हा तरूण रविवारी सायंकाळी भारतनगर येथील कॅप्टन पेट्रोलपंपाजवळील नव्याने सुरू असलेल्या बांधकाम साईटवर काम करीत असतांना ही घटना घडली. सातव्या मजल्यावर इलेक्ट्रीक साधनांच्या माध्यमातून तो काम करीत असतांना अचानक इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने तो इमारतीवरून फेकला गेला होता. सातव्या मजल्यावरून जमिनीवर कोसळल्याने तो गंभीर जखमी झाला होता. या घटनेत त्याच्या छातीस मोठी दुखापत झाली होती. मित्र गुलाब बेंडकुळे याने त्यास तातडीने नजीकच्या सह्याद्री हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता डॉ.भाग्यश्री निकम यांनी त्यास उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक राजू शिंदे करीत आहेत.