टाकळीरोड भागात घरफोडी; चोरट्यांनी ६५ हजाराचा ऐवज केला लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ६५ हजाराच्या ऐवज लंपास केल्याची घटना टाकळीरोड येथे झाली आहे. या घरफोडीत चोरटयांनी सोन्याचांदीच्या अलंकारासह रोख रक्कम चोरुन नेली. या चोरीप्रकरणी दमयंती जयराम जाधव (७० रा.पिनाक बिल्डींग,वनसाद सोसा.सिंगापूर गार्डन) यांनी तक्रार दाखल केली असून भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाधव कुटुंबिय २७ ते ३१ मार्च दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व दागिणे असा सुमारे ६५ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
दोघा भावांनी टिकाव मारल्याने तरुण जखमी
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नानाचे मळा हॉटेल जवळ फोनवर बोलतांना शिवीगाळ का करता असा जाब विचारणा-या एकास दोघा भावांनी मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत तरूणास टिकाव मारल्याने तो जखमी झाला आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश भाऊसाहेब सुर्यवंशी व दिपक भाऊसाहेब सुर्यवंशी असे तरूणास मारहाण करणा-या संशयित भावांची नावे आहेत. याप्रकरणी योगेश अशोक दाभाडे (रा.घनसोली,नवी मुंबई) यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयित नानाचे मळा हॉटेल भागातील सिमेंट खडीची बॅ्रण्ड फॅक्टरीवर काम करतात. दाभाडे गुरूवारी (दि.३०) या फॅक्टरीवर कामानिमित्त गेले होते. यावेळी दोघे भाऊ आपल्या मोबाईलवर बोलतांना शिवीगाळ करीत होते. त्यामुळे दाभाडे यांनी त्यांना फोनवर बोलतांना शिवीगाळ का करतात असे विचारल्याने संतप्त भावांनी त्यांना मारहाण करीत पाठीमागून टिकाव मारला. या घटनेत दाभाडे जखमी झाले असून अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
……..