गोदापात्रात मित्रांसमवेत आंघोळीसाठी आलेल्या
१७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोदापात्रातील गांधी तलावमध्ये मित्रांसमवेत आंघोळीसाठी आलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सहर्ष राजेंद्र भालेराव (रा.प्रणव स्टॅम्पींग कंपनी मागे,नवनाथनगर अंबड) असे मृत मुलाचे नाव आहे. जीवरक्षकांनी वेळीच धाव घेत सहर्षला पाण्याबाहेर काढून जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सहर्ष भालेराव या युवक शुक्रवारी (दि.३१) आपल्या मित्रांसमवेत गोदाघाटावर आला होता. दुपारच्या सुमारास सर्व मित्र गोदापात्रातील गांधी तलाव भागात आंघोळ करीत असतांना ही घटना घडली. आंघोळ करीत असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला होता. यावेळी अन्य मित्रांनी आरडाओरड केल्याने जीवरक्षकांनी वेळीच धाव घेत त्यास पाण्याबाहेर काढले. गंभीर अवस्थेत त्यास जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले.
शहरात वावर ठेवणा-या तडीपारास
पोलिसांनी केले गजाआड
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील सावता नगर भागात शहरात वावर ठेवणा-या तडीपारास पोलिसांनी गजाआड केले आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहूल दिलीप मुसळे (४५ रा. अंबिका अपा.त्रिमुर्ती चौक,पाटीलनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तडिपाराचे नाव आहे. मुसळे याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे पोलिसांनी त्यास शहर आणि जिल्ह्यातून सहा महिन्यासाठी हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिस त्याच्या मागावर असतांना गुरूवारी (दि.३०) रात्री तो सावता नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस गार्डन भागात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी धाव घेत संशयितास ताब्यात घेतले असून पोलिस शिपाई संदिप भुरे यांच्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी हद्दपार आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार देशमुख करीत आहेत.
…..