भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीत भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. योगेश भाऊसाहेबसिंग परदेशी (३२ रा.एक्स्लो पॉईंट,रामकृष्ण नगर,अंबडलिंकरोड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
परदेशी बुधवारी (दि.२२) सातपूर औद्योगीक वसाहतीत गेले होते. रात्री नऊ वाजेच्या सुमारास ते आपल्या दुचाकीने घराकडे परतत असतांना हा अपघात झाला. सीएट कंपनी समोरून ते प्रवास करीत असतांना समोरून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. चुलत भाऊ अनिल परदेशी यांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार आहेर करीत आहेत.
शस्त्राचा धाक दाखवित महिलेस शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गणेशवाडी भागात किरकोळ कारणातून धारदार शस्त्राचा धाक दाखवित एकाने महिलेस शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी आदेशाचे उलंघन आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय चंदर कुंदे (रा.मुंजोबा चौक,गणेशवाडी) असे महिलेस धमकी देणा-या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी परिसरातील ३५ वर्षीय महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बुधवारी (दि.२२) सायंकाळच्या सुमारास मुंजोबा चौकात ही घटना घडली. पिडीता पायी जात असतांना संशयित रस्त्यात उभा होता. महिलेने त्यास बाजूला व्हा असे सांगितल्याने संतप्त संशयिताने धारदार शस्त्र आणून महिलेस शिवीगाळ करीत तुला मारून टाकीन अशी धमकी दिली. अधिक तपास जमादार काकड करीत आहेत.