पोलिस असल्याची बतावणी करीत वृध्दास गंडा; अडीच लाख रूपये किमतीचे अलंकार केले लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदेगाव येथे पोलिस असल्याची बतावणी करीत दोघा भामट्यांनी वृध्दास गंडा घातला. तपासणी सुरू असल्याची बतावणी करीत भामट्यांनी वृध्दाच्या अंगावरील सुमारे अडीच लाख रूपये किमतीचे अलंकार काढून ठेवण्याचा सल्ला देत दागिणे लांबविले असून याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिराजी तुळशीराम सोनवणे (७६ रा.कार्तिक सेक्टर,मोरवाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. सोनवणे बुधवारी (दि.२२) शिंदेगावात गेले होते. दुपारच्या सुमारास ते पठाण पेट्रोलपंप परिसरातून पायी जात असतांना ही घटना घडली. अज्ञात दोघा भामट्यांनी त्यांना गाठून पोलिस असल्याची बतावणी केली. यावेळी संशयितांनी पुढे तपासणी सुरू असल्याचे सांगत अंगावरील सोन्याचे लॉकेट व अंगठ्या काढून ठेवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मदतीचा बहाणा करून भामट्यांनी सुमारे अडीच लाख रूपये किमतीचे दागिणे लांबविले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक जी.के.शेळके करीत आहेत.
सहकार कॉलनीत घरफोडी; ७० हजाराचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सहकार कॉलनीत झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ७० हजाराच्या ऐवज लंपास केला. टाकळीरोड परिसरात ही घरफोडी झाली. या घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीच्या दागिणे चोरुन नेले. याप्रकरणी रामदास शिवराम तुपलोंढे (६४ रा.श्री बंगलो सहकार कॉलनी) यांनी तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुपलोंढे कुटुंबिय १२ ते २२ मार्च दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद बंगल्याच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ७० हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार शेजवळ करीत आहेत.