नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टिंडर अॅप लॉग इन करण्याच्या बहाण्याने भामट्यांनी एनी डेस्क अॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडून नोकरदाराच्या बँक खात्यातील दोन लाख लंपास केले आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हसरूळ भागात राहणा-या ४६ वर्षीय नोकरदाराने याबाबत तक्रार दाखल केली आहे.
सोशल मिडीयावरील माहितीच्या आधारे सदर इसमास टिंडर अॅपची माहिती मिळाली होती. निशुल्क असलेल्या या अॅपची जगभरात ५५ कोटीहून अधिक सभासद संख्या असल्याने सदर व्यक्तीची उत्सुकता शिगेला पोहचली होती. या अॅपच्या माध्यमातून स्त्री पुरूष सुरक्षितरित्या एकमेकांशी मनमोकळया गप्पा आणि रोमांस करीत असल्याने तरूणाईसह अविवाहीतांसाठी अॅप पर्वणी ठरली आहे.
सिंगल असलेल्यांना पार्टनर तर विवाह इच्छुकांना पंसतीनुसार वधू वराचे परिक्षणही या अॅपच्या माध्यमातून होते. या अॅपवर फेक युजर्स टाळण्यासाठी सरकारी कागदपत्राच्या आधारे युजर्स आयडी केली जात असल्याने खात्रीशीर मित्र मैत्रीण भेटण्याची संभावना अॅपच्या माध्यमातून होते. त्यामुळे नाशिकच्या नोकरदारास या अॅपचे आकर्षण होते.
२६ फेब्रुवारी रोजी सदर इसम मोबाईलवरील प्ले स्टोरच्या माध्यमातून या अॅपची पडताळणी करीत असतांना त्यांना ८९१०६७४९२९ व ९३३७०३८८४९ या क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला. सदर व्यक्तीने नोकरदारास टिंडर अॅपचे लॉग इन करून देण्याच्या बहाण्याने एनी डेस्क हे अॅप डाऊनलोड करण्यात भाग पाडून त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यातील दोन लाख रूपयांच्या रकमेवर ऑनलाईन डल्ला मारला. सदरची रक्कम अन्य खात्यात वर्ग करून भामट्यांनी हा गंडा घातला असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक सुरज बिजली करीत आहेत.