नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बनावट व्यवहार दाखवून व्यवस्थापकानेच कार खरेदी विक्री व्यवहारात कंपनीस २७ लाखाला गंडा घातला आहे. अजित दिलीप मोरे (४२ रा.देवळालीगाव) असे कंपनीस गंडा घालणा-या संशयित व्यवस्थापकाचे नाव आहेत. या फसवणूक प्रकरणी सुवोब्रता सुखेंदू सहा (रा.पश्चिम बंगाल) यांनी तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंगलुर येथील झिंका लॉजिस्टीक्स सोल्यशन्स प्रा.लि. या कंपनीच्या नाशिक शाखेचे अजित दिलीप मोरे व्यवस्थापक आहे. या कंपनीचा वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. कंपनीच्या कार मॉलमध्ये गेल्या १ ऑगष्ट ते ३ मार्च २०२३ दरम्यान संशयिताने आठ वाहनांचे खरेदी विक्री व्यवहार झाल्याचे दर्शविले. या व्यवहारापोटी मिळेल्या टोकन रक्कमा त्याने कंपनीच्या बँक खात्यातही भरल्या. मात्र प्रत्यक्षात सदर वाहनांचे बनावट व्यवहार केल्याचे समोर आले असून स्व:ताच्या आर्थिक फायद्यासाठी त्याने अपहार केल्याचे उघड झाले आहे. बनावट खरेदी विक्री व्यवहार दाखवून त्याने तब्बल २६ लाख ९५ हजारास कंपनीस गंडविले असल्याचे कंपनीचे सहा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सचिन चौधरी करीत आहेत.