नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेठरोडवरील कर्ननगर भागात पाळीव कुत्रा व्यवस्थीत सांभाळण्यास सांगितल्याच्या रागातून मायलेकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत मायलेक जखमी झाले आहे. या मारहाण प्रकरणी प्रतिभा शेलार (रा.मानस अपा.कर्ननगर,पेठरोड) यांनी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सारिका संदिप सुपेकर, सिंधूबाई शेवाळे, नंदा कोरडे, साई कोरडे व मयुर ज्ञानेश्वर जाधव अशी मायलेकांना मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. शेलार यांच्या आई सिधूंबाई आणि भाऊ तुषार निंबा खैरनार हे दोघे या घटनेत जखमी झाले आहेत. सिंधूबाई व तुषार खैरनार हे दोघे बुधवारी (दि.२२) आपल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये उभे असतांना त्याच सोसायटीतील सारिका सुपेकर या आपल्या पाळीव कुत्र्यास सोबत घेवून आल्या. यावेली शेलार यांच्या आई सिंधूबाई यांनी सुपेकर यांना कुत्र्यास व्यवस्थीत सांभाळण्याचा सल्ला दिल्याने हा वाद झाला. सुपेकर यांनी उर्वरीत संशयितांना बोलावून घेत सिंधूबाईशी वाद घातला या वेळी तुषार खैरनार हे आपल्या आईच्या मदतीला धावून गेले असता संतप्त संशयितांनी काहीतरी हत्याराने दोघा मायलेकांना मारहाण केली. या घटनेत काही तरी हत्याराचा वापर करण्यात आल्याने दोघे जखमी झाले असून सिधूबाई यांच्या कानाला दुखापत होवून कानातील सोन्याचा वेल गहाळ झाला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.