नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरफोडी करत चोरट्यांनी सुमारे ८१ हजाराचा ऐवज लंपास केला आहे. आडगाव म्हसरूळ लिंकरोडवरील म्हस्के मळा भागात झालेल्या या घरफोडीत चोरट्यांनी सोन्याचांदीच्या दागिण्यांसह महत्वाच्या कागदपत्रेही चोरुन नेली. या घरफोडी प्रकरणी तुषार हरी पवार (रा.साईअंगण रो हाऊस,कल्पतरू गार्डन म्हाडा बिल्डींगजवळ) यांनी तक्रार दाखल केली असून आडगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवार कुटुंबिय बुधवारी (दि.२२) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिणे व कागदपत्र असा सुमारे ८१ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास जमादार वाढवणे करीत आहेत.