नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – फुलेनगर येथील सम्राटनगर भागात दोघा भावांना मारहाण करीत टोळक्याने दुचाकी व दवाखान्याची तोडफोड केल्याची घटना घडली. या घटनेत वाद मिटविण्यासाठी गेलेली एक महिलाही जखमी झाली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर काळू पवार (२६ रा.वज्रेश्वरीनगर,दिंडोरीरोड) या युवकाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, बुधवारी (दि.२२) सायंकाळच्या सुमारास आजारी लहान भावास घेवून सम्राटनगर येथील डॉ.धनंजय पाटील यांच्या दवाखान्यात गेलो असता आतिश बोडके,बाळा निपळुंगे व त्यांच्या दोन साथीदारांनी कुठलेही कारण नसतांना दवाखान्यात शिरून दोघा भावांना शिवीगाळ व लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी टोळक्याने जीवे मारण्याची धमकी देत कोयत्याचा धाक दाखवत दहशत माजविण्यासाठी दवाखान्याच्या खिडक्या व दरवाजाची तसेच पवार यांची दवाखान्याबाहेर लावलेल्या मोटारसायकलची (एमएच १५ डीजी ६४७४) तोडफोड करून नुकसान केल्याचे म्हटले आहे. तर पदमाबाई रामदास लोढे (रा.म्हाडा बिल्डींग,सम्राटनगर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बुधवारी डॉ.धनंजय पाटील यांच्या दवाखान्या समोर सुरू असलेला वाद सोडविण्यासाठी गेली असता सागर पवार या संशयिताने कुठलेही कारण नसतांना हातातील टोकदार वस्तू कपाळावर मारून जखमी केल्याचे म्हटले आहे. दोन्ही घटनांप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास पोलिस नाईक सानप व सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.