नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – किरकोळ कारणातून एकाने दोघांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना अरिंगळे मळा भागात घडली आहे. या घटनेत महिलेसह एक जण जखमी झाला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनिष लक्ष्मण मोहिते (२८ रा.मोहिते पार्कमागे,अरिंगळे मळा) असे संशयित हल्लेखोराचे नाव आहे. याप्रकरणी संजना मनोहर महाले (रा.मोहिते पार्क मागे) यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयित व तक्रारदार हे एकमेकांचे शेजारी असून त्यांच्यात बुधवारी (दि.२२) सकाळी किरकोळ कारणातून वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून संशयिताने दुपारच्या सुमारात महाले यांच्या घरात प्रवेश करून त्यांचा भाऊ दत्तू मनोहर महाले व शिष्य सिध्दी विजय बर्वे या महिलेवर कोयत्याने हल्ला केला. यात दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.