नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड परिसरातील अट्टल गुन्हेगार सचिन उर्फ घोड्या मधुकर तोरवणे याच्या नाशिक पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. एमपीडीए कायद्यान्वये त्याच्यावर पुन्हा एकदा स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. २०१९ मध्येही शहर पोलिसांनी त्याच्याविरूद्ध एक वर्ष कालावधीसाठी स्थानबध्दतेची कारवाई केली होती. मात्र त्याच्या गुन्हेगारी कारवाया पुन्हा सुरू झाल्याने त्यास स्थानबध्द करण्यात आले आहे.
घोड्या तोरवणे याची नारायणबापूनगर, लोखंडे मळा, दसक, जुना सायखेडारोड, जेलरोड व नाशिकरोड परिसरात मोठी दहशत आहे. धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटमार, जबर दुखापत, जबरीचोरी, खुनाचा प्रयत्न, विनयभंग, गैर कायद्याची मंडळी जमवून मारहाण करणे, दहशत निर्माण करणे असे विविध गुन्हे करण्यात तो माहिर आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीवर त्यास शहर पोलिसांनी सन.२०१९ मध्येही स्थानबध्द केले होते.
कारागृहातून बाहेर पडताच त्याने पुन्हा आपले वर्चस्व कायम राहण्यासाठी गुन्ह्यांची मालिका सुरू केली होती. शहरातील उपनगरसह पिंपळनेर जि.धुळे या पोलिस ठाण्यात त्याच्याविरूध्द अनेक गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी त्याच्यावर पुन्हा एकदा स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. त्यास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले आहे. शहर पोलिसांची या वर्षातील ही दुसरी कारवाई असून यापूर्वी सराईत गणेश उर्फ छकुल्या वाघमारे यास स्थानबध्द करण्यात आले आहे.