नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे ठक्कर डोम येथे आयोजीत आॅटो अॅण्ड लाॅजेस्टिक एक्सपो नवयुवकांसाठी रोजगार देणारा ठरला आहे. पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात मागील दोन दिवसात जवळपास हजारो युवकांनी रोजगारासाठी नोंदणी केली. त्यापैकी ८५० युवकांना बाॅश, एबीबी यांसारख्या नामवंत कंपन्यात घसघशीत पगाराची नोकरी मिळाली आहे. पुढील दोन दिवसात हा आकडा आणखी वाढणार असून रोजगाराच्या शोधात असलेल्या एक्सपोच्या माध्यमातून बड्या कंपन्याची आॅफर खुणावत आहे.
नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन तर्फे आयोजीत चार दिवसीय आॅटो अॅण्ड लाॅजेस्टिक एक्स्पो शहराच्या वाहतूक व्यवसाय निगडित उद्योजकांसाठी वरदान ठरत आहे. या ठिकाणी सायकलपासून ते अगदी जेसीबीपर्यंत वाहने प्रदर्शनात ठेवण्यात आली असून वाहतूक क्षेत्राचा बदलता प्रवास व आव्हाने याचा पट उलगडण्यात आला आहे. या ठिकाणी नामवंत व बड्या कंपन्याचे स्टाॅल उभारण्यात आले असून मागील दोन दिवसात हजारो नाशिककरांनी त्यास भेट देत माहिती घेतली.
या एक्स्पोचे महत्वाचा उद्देश म्हणजे युवकांना रोजगार उपलब्धकरुन देणे आहे. त्यास मोठे यश लाभले असून आतापर्यंत एक हजारांहून अधिक युवकांनी या ठिकाणी नावनोंदणी केली व त्यापैकी ८५० जणांना लागलीच मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी लाभली. पहिल्या दिवशी गुरुवारी (दि.२५) ५८० जणांना नोकरीची संधी मिळाली व चाळीसजणांना हातात आॅफर लेटर मिळाले. तर दुसर्या दिवशी शुक्रवारी (दि.२६) २६९ युवकांचे सिलेक्शन करण्यात आले.
या दिग्गज कंपन्यांनी दिला रोजगार
महिंद्रा अँड महिंद्रा, बॉश, एम.एस.एल ड्राईव्ह लाईट, व्ही.आय.पी, डेटा मॅटिक, टपारिया टूल्स, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, आदित्य बिर्ला कॅपिटल, एम.एन. कॉम्पोनंट यासह विविध कंपन्यांनाचा सहभाग आहे.
*या पदांसाठी भरती*
फिटर, वेल्डर गॅस अॅन्ड ईलेक्ट्रिक, मॅकेनिक मोटर व्हेईकल, पेंटर, इलेक्ट्रीशियन, फिटर, डिझेल मॅकेनिक, ईलेक्ट्रानिक मॅकेनिक, शिट मेटल वर्कर, टुल अँन्ड डाय मेकर, वायरमन, १२ वी उत्तीर्ण, डिप्लोमा इन मॅकेनिकल इंजिनिअरींग, मिलींग ऑपरेटींग अँन्ड प्रोग्रामिंग, मेकॅनिक मशिन टुल मेंटेनन्स, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, एमबीए, फायनन्स या विविध पदांचा समावेश आहे.
फूड फेस्टिवलला प्रतिसाद
ऑटो अँड लॉजिस्टिक्स एक्स्पो अंतर्गत एक देश अनेक व्यंजन या संकल्पनेखाली विविध राज्यातील खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले आहे. या स्टॉलवर खवय्या नाशिककरानी मोठी गर्दी केल्याचे पहावयास मिळत असून या फूड फेस्टिवलला चांगला प्रतिसाद लाभत आहे.
दोन दिवसात पाच गाड्यांची विक्री
एक्स्पो मध्ये विविध कंपन्यांच्या मालवाहतूक व इतर वाहनाचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. या प्रदर्शनात पहिल्या दोन दिवसात अशोक लेलँड आणि टाटा कंपनीच्या एकूण पाच वाहनाची विक्री करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.
पालकमंत्री दादा भुसे यांची एक्स्पोला भेट
पालकमंत्री दादा भुसे यांनी त्यांच्या व्यस्त दौर्यात एक्स्पोला शुक्रवारी (दि.२६) भेट देत प्रदर्शनातील स्टाॅलला भेट दिली. यावेळी ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या समस्या व अडचणींची माहिती घेतली. असोसिएशनच्या समस्या शासन दरबारी मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच असोसिएशनतर्फे चालकांसाठी सारथी केंद्र उभारले जाणार असून या सुत्य उपक्रमाची दखल घेत कौतुक केले. यावेळी त्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दोन तरुणांना नोकरीचे ऑफर लेटर देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र महासंघाचे प्रकाश गवळी, उदय सांगळे, अध्यक्ष राजेंद्र फड, उपाध्यक्ष पी.एम.सैनी, माजी अध्यक्ष जयपाल शर्मा, बाळासाहेब कलशेट्टी, रत्नागिरीचे इम्रान मेमन, सुभाष जांगडा, महेंद्रसिंग राजपूत, शंकर धनावडे, रामभाऊ सुर्यवंशी यांच्यासह ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
Nashik Auto Logistic Expo 850 Youth Job