नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत आणि मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती अशी नाशिक बाजार समितीची ओळख आहे. सहाजिकच तिच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांनी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली आहे. माघारीचा दिवस उलटताच या निवडणुकीला गालबोट लागले आहे. इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांना धमकी देण्यात आली आहे. खोसकर यांच्या तक्रारीवरुन नाशिक तालुका पोलिस स्टेशनमध्ये माजी सभापती शिवाजी चुंभळे आणि त्यांचे पुत्र अजिंक्य यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं
नाशिकसह जिल्ह्यातील एकूण १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची सार्वत्रिक निवडणूक सध्या होत आहे. माघारीचा दिवस उलटल्याने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रचाराला मोठा वेग आला आहे. त्यातच आता एक गंभीर बाब घडली आहे. इगतपुरीच्या आमदारांना थेट धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी नाशिक तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रचारावरून शेतकरी विकास पॅनलचे नेते शिवाजी चुंभळे यांनी थेट आमदार हिरामण खोसकर यांना फोनवरून धमकी दिली. त्यानंतर आमदार खोसकर यांनी पोलिसात तक्रार दिली. त्याची दखल घेत पोलिसांनी शिवाजी चुंभळे यांच्यासह त्यांचे पुत्र अजिंक्य चुंभळे यांच्यावर अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे.
असे आहे राजकारण
नाशिक कृषी बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांची महाविकास आघाडी विरुद्ध भाजप व शिवसेना शिंदे गट असे चित्र आहे. मात्र, प्रत्यक्षात माजी सभापती देविदास पिंगळे आणि शिवाजी चुंभळे यांनी आपापली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. परिणामी, महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-शिंदे गट असे चित्र नाही. तर पिंगळे विरुद्ध चुंभळे अशी लढत होणार असल्याचे दिसून येत आहे.
Nashik APMC Election MLA Threat FIR Booked Politics