नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोत भरदिवसा गोळीबार करीत पसार झालेली सात जणांची टोळी पोलिसांनी हुडकून काढली असून, या टोळीच्या म्होरक्यासह त्याच्या साथीदारांना मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर भागात सापळा लावून बेड्या ठोकण्यात आल्या. संशयितांच्या ताब्यातून अलिशान कारसह दोन धारदार शस्त्र हस्तगत करण्यात आले असून ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली. या टोळीच्या अटकेने सिडकोतील चकमकीचा उलगडा होणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण दत्तूआण्णा शेळके,सचिन पोपट लेवे (रा. दोघे पंचवटी),किशोर बाबुराव वाकोडे (रा. कथडा जुने नाशिक), राहूल अजयकुमार गुप्ता (रा. पंचवटी), अविनाश गुलाब रणदिवे (रा. सातपूर), श्रीजय उर्फ गौरव संजय खाडे (रा.जुना आडगावनाका) व जनार्दन खंडू बोडके (रा. पंचवटी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. सराईत गुन्हेगार तथा भाजपाचा माथाडी कामगार संघटनेचा जिल्हाध्यक्ष राकेश तुकाराम कोष्टी याच्यावर रविवारी (दि. १६) सकाळच्या सुमारास सिनेस्टाईल हल्ला झाला होता.
अॅक्टीव्हावर देवदर्शनासाठी जात असलेल्या कोष्टी याच्यावर पल्सरस्वार त्रिकुटाने भरदिवसा गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेत दोन गोळ््या लागल्याने कोष्टी जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सिडकोतील बाजीप्रभू चौकात ही घटना घडली होती. या घटनेने संपुर्ण शहरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गॅगवार मधून ही घटना घडल्याचे बोलले जावू लागल्याने पोलिसांनीही तात्काळ चक्र फिरवित नामचिन जया दिवे, विकी ठाकूर, किरण क्षिरसागर आणि गौरव गांगुर्डे आदीं संशयितांना अटक केली. मात्र पसार झालेल्या संशयितांचा माग लागत नव्हता.
अंबड पोलिसांसह गुन्हे शाखा संशयितांच्या मागावर असतांनाच युनिट १ च्या पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली इंदोर मार्गे ओंकारेश्वर नजीकच्या बडवाह जि. खरगोन या गावात पोहचलेल्या पथकाने तब्बल अठरा तास सापळा लावून ही कामगिरी केली. किरण शेळके या म्होरक्यासह अन्य साथीदारांच्या मुसक्या आवळत पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील एमएच ४३ व्ही ४९६९ या स्कोडाकारसह दोन धारदार चाकू असा सुमारे ४ लाख २ हजार रूपये किमतीचा ऐवज हस्तगत केला आहे.
संशयितांसह मुद्देमाल अंबड पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आला आहे. ही कामगिरी सहाय्यक उपनिरीक्षक रविंद्र बागुल,हवालदार प्रविण वाघमारे,प्रदिप म्हसदे,नाझीम खान पठाण,संदिप भांड,शरद सोनवणे,पोलिस नाईक विशाल देवरे,प्रशांत मरकड व महेश साळुंखे आदींच्या पथकाने केली.
Nashik Cidco Firing Police Arrest 7 Suspect from Madhya Pradesh