नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक देशाच्या हवाई नकाशावर आणण्यासाठी ,नाशिककरांची अराजकीय चळवळ असणाऱ्या ‘मी नाशिककर’ने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. नुकतीच नाशिकहून देशातील विविध शहरांसाठी हवाई सेवा सुरु झाली आहे.
नाशिकच्या एअरपोर्टचे व तेथून उड्डाण होणाऱ्या हवाई सेवांचे नियमित ब्रॅन्डीग होण्यासाठी मी नाशिककरने पुन्हा एकदा पुढाकार घेतला असून नाशिकला येणाऱ्या पाचही रस्ते मार्गांवर नाशिक विमानतळ व तेथून उपलब्ध सेवांची माहिती देणाऱ्या ब्रॅन्डीग बोर्ड चे काम पूर्ण झाले असून हे सर्व बोर्ड्स पीपीपी मॉडेलने उभारले असल्याची माहिती या प्रकल्पासाठी पुढाकार घेणारे ‘मी नाशिककर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोठेकर यांनी दिली.
आजमितीला ‘मी नाशिककर’ हि चळवळ हि नाशिककरांचा नाशिकच्या विकासासाठी एकत्रित आवाज झाला असून ईएसडीएस चे पियुष सोमाणी व अॅक्सेस ग्रुप चे संजय कोठेकर यांच्या सोबत शहरातील विविध २६ व्यावसायिक व सामाजिक संस्थांमधील ८० हून अधिक बिसिनेस लीडर्स ‘मी नाशिककर’ या चळवळीशी जोडले आहेत. ‘मी नाशिककर’ हि १० विविध प्रमुख उद्दिष्टांसाठी कार्यरत असून या उद्दिष्टांसाठी विविध समिती काम बघतात. विकासाला नविन दिशा मिळावी यासाठी पीपीपी मॉडेल देखील ‘मी नाशिककर’ तर्फे अंगिकारले आहे. मी नाशिक कर चे संस्थापक सदस्य उमेश वानखेडे , मनिष रावल व किरण चव्हाण यांची सुद्धा ‘मी नाशिककर’ च्या विविध उपक्रमात सक्रीय भूमिका असते.
या मार्गावर लावले ६१ बोर्ड –
रोड नं १ – घोटी ते गरवारे
रोड नं २ – गरवारे ते द्वारका
रोड नं ३ – द्वारका ते आडगाव
रोड नं ४ – आडगाव ते एअरपोर्ट
रोड नं ५ – ओढा ते औरंगाबाद नाका
रोड नं ६ – सिन्नर ते नाशिक रोड फ्लायओव्हर
रोड नं ७ – त्रंबक ते नाशिक
पुढील मार्गांवर आगामी कालावधीत ५० बोर्ड लावण्यात येतील –
रोड नं ८ – कसारा ते घोटी
रोड नं ९ – पिंपळगाव ते एअरपोर्ट
रोड नं १० – जव्हार ते त्रंबक
रोड नं ११ – पेठ रोड ते नाशिक
रोड नं १२ – दिंडोरी ते नाशिक
ब्रॅण्डिंग बोर्ड या उपक्रमामुळे नाशिककर तसेच नाशिकला येणाऱ्या सर्व प्रवासी व नाशिककरांना नाशिकहून विविध ठिकाणी जाणाऱ्या व नाशिकला येणाऱ्या विमान सेवांची माहिती नियमितरीत्या मिळेल.ज्यामुळे विमान सेवे बाबत जनजागृती होईल
या सर्व उपक्रमासाठी NHAI (नॅशनल हायवे ऑथारिटी ऑफ इंडिया) चे प्रकल्प अभियंता नितीन पाटील व कंत्राटदार एस. एस. एन्टरप्राईजेसचे सहकार्य मिळाले असून या उपक्रमासाठी नाशिककर तसेच नाशिकच्या अनेक कंपन्यांनी स्वेच्छेने आर्थिक सहकार्य केले आहे . या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात एकूण 61 बोर्ड्स लावण्यात आले आहेत. यामध्ये सुला वाईन यार्ड्सने 20, अशोका बिल्डकॉनने 15, फॉक्स कंट्रोल सोल्युशन्सने 10, अॅक्सेस ग्रुपने 14, ई बनिया ग्रोसरी प्रा लि.ने 10 व विवेदा वेलनेसने 6 बोर्ड्सचा खर्च उचलला आहे. यानंतर दुस-या टप्प्यामध्ये अजून ५० बोर्ड उभारण्यात येणार असून यासाठी संस्थांनी पुढे यावे असे आवाहन ‘मी नाशिककर’ तर्फे करण्यात आले आहे.
Nashik Air Service Branding Promotion NGO Initiative