नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील जिल्हा सरकारी वकील अॅड. अजय मिसर यांची मुंबई ७ /११ साखळी बॉम्बस्फोट खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आजवर त्यांनी अनेक खटल्यांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. त्याची दखल घेत त्यांना आता ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
दिनांक १३/०७/२०११ रोजी सायंकाळी ०६.५५ मिनिट ते ७.०५ मिनिटांचे दरम्यान ऑपेरा हाउस मुंबई, झवेरी बाजार मुंबई, दादर मुंबई या ठिकाणी तीन शक्तीशाली बॉम्बस्फोट झाले होते. सदर बॉम्बस्फोटात अनेक लोकं मृत्युमुखी पडले व अनेक लोक गंभीर जखमी झालेत. सदर बॉम्बस्फोटांमध्ये खाजगी व शासकीय मालमत्तचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, या कामी डी.बी.मार्ग पोलीस स्टेशन, मुंबई, एल. टी. मार्ग पोलीस स्टेशन, मुंबई व शिवाजी पार्क पोलीस स्टेशन, दादर, मुंबई येथे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर साखळी बॉम्बस्फोट गुन्हयाचा तपास दहशतवादी विरोधी पथक, मुंबई यांचेकडे सोपविण्यात आला. तपासाअंती सदर साखळी बॉम्बस्फोट हे दहशतवादी संघटना इंडीयन मुजाहिद्दीन यांनी घडविल्याचे तपासात निष्पन्न झाले.
दहशतवाद विरोधी पथक, मुंबई यांनी तपास पूर्ण करुन आरोपी नामे १) नकी वसी अहमद शेख, अटक दिनांक १५/०१/२०१२, २) दिनांक १५/०१/२०१२, अहमद नदीम अख्तर अश्पाक शेख, अटक ३) कंवलनयन वझीरचंद पथरेजा, (मयत) अटक दिनांक ३१/०१/२०१२, ४) हारुन रशिद अब्दुल हमीद नाईक उर्फ उमर अकबर उर्फ मुश्ताक शेख उर्फ सलाउद्दीन, अटक दिनांक ०१/०२/२०१२, ५) कफिल अहमद मोहमंद अयुब अन्सारी, अटक दिनांक १९/०५/२०१२, ६) मोहम्मद अहमद मोहम्मद इरार सिध्दीबापा उर्फ अहमद उर्फ इम्रान उर्फ यासिन भटकल उर्फ शिवानंद, अटक दिनांक ०५/०२/२०१४, ७) असदुल्ला अख्तर जावेद अख्तर उर्फ हड्डी उर्फ तबरेज उर्फ शकिर उर्फ डॅनियल उर्फ दानिष उर्फ आदिल, अटक दिनांक ०५/०२/२०१४, ८) एजाज सईद शेख उर्फ समिर उर्फ समर उर्फ सागर उर्फ आमिर उर्फ वसील उर्फ इब्राहिम, अटक दिनांक ०३/१२/२०१४, ९) सय्यद इस्माईल अफाक अलिम लंका, अटक दिनांक ३०/०३/२०१५ १०) सद्दाम हुसैन फैरोज खान, अटक दिनांक ३०/०३/२०१५ ११) झैनुल आबेदिन अब्दुल रझाक शेख उर्फ जाहिद, अटक दिनांक २६/०४/२०१६ यांना अटक केली होती.
सदर गुन्हयाचे दोषारोपपत्र मुंबई येथील विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले. याकामी प्रचंड मोठ्या प्रमाणात तांत्रीक पुरावा तसेच जप्ती करण्यात आली होती. तपासादरम्यान आरोपींनी बॉम्बस्फोटासाठी वापरलेले वाहनांचा तपशील, बॉम्ब बनविण्यासाठी केलेली कारवाई, आरोपींनी रचलेले कटकारस्थान, सिमकार्डस्, हवालामार्फत आलेले पैसे, सीसीटीव्ही फुटेज, इंडीयन मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेची कार्यप्रणाली, त्यांचा अर्थ पुरवठा, लॉजिस्टीक सपोर्ट याबाबत सखोल तपास करण्यात आला.
सदर साखळी बॉम्बस्फोटात ऑपेरा हाउस येथे १५ लोक मयत व ७० लोक गंभीर जखमी झाले. झवेरी बाजार येथे ११ लोक मयत व ४३ लोकं गंभीर जखमी झाले. कबुतर खाना, दादर येथे १ इसम मयत व १४ लोक गंभीर जखमी झाले, सदर बॉम्बस्फोटात एकूण २७ लोक मयत व १२७ लोकं गंभीर जखमी झाले होते. सदर बॉम्बस्फोटात अमोनियम नायट्रेट, पेट्रोलीयम हायड्रोकार्बन ऑईल वापरण्यात आले होते. सदर प्रकरणाचे गांभिर्य व आरोपींचे इंडीयन मुजाहिद्दीन या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेशी असलेले संबंध बघता आरोपींना तळोदा जेल मुंबई, तिहार जेल दिल्ली, चेरलापल्ली जेल, बंगलोर जेल अशा विविध तुरुंगात ठेवण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र शासनाने दहशतवाद विरोधी पथक, मुंबई यांचे शिफारसीवरुन दिनांक ०९/०५/२०२३ रोजीचे अधिसूचनेवरुन अॅड. अजय मिसर, जिल्हा सरकारी वकील, नाशिक यांची याकामी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. अॅड. अजय मिसर यांनी यापुर्वी देखील पाकमोडीया स्ट्रीट फायरींग केस (छोटा राजन), २००८ मालेगांव बॉम्बस्फोट केस, २६/११ मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अबु जुंदाल तसेच लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे आरोपी बिलाल शेख, हिमायत बेग यांची महाराष्ट्र पोलीस अॅकेडमी रेकी केस, वर्धन घोडे खुन खटला, शिर्डी येथील पाप्या शेख व इतर यांचा मोक्का खटला, पीएमसी बॅक घोटाळा खटला, एमएससी बँक घोटाळा खटला, दाउद इब्राहीम कासकरचा भाऊ इकबाल कासकरचा खंडणी खटला, महाराष्ट्रातील गॅगस्टर रवी पुजारी याचेवरील सर्व खटले, बिपीन बाफणा खुन खटला असे शासनाचे अनेक संवेदनशील खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून कामकाज केले आहे. अॅड. अजय मिसर यांचा संवेदनशिल खटल्यांचे कामांचा अनुभव बघता शासनाने ७ /११ मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटल्याकामी त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे.
” ७/११ मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटला हा इंडीयन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने बॉम्बस्फोटचे माध्यमातून केलेला दहशतवादी हल्ला आहे. या खटल्याकामी प्रचंड मोठा प्रत्यक्ष, परिस्थीतीजन्य व तांत्रीक पुरावा मे. न्यायालयासमोर मांडण्याचे मोठे आव्हान प्रॉसेक्युशनवर आहे. याकामी एटीएस मुंबई यांनी चांगला तपास केला आहे. अशा प्रकारचे खटले विशीष्ट विचारसरणी व विचारपूर्वक चालविणे आवश्यक आहे. प्रचंड मोठया प्रमाणात कागदोपत्री पुरावा शाबीत करणे ही प्रॉसेक्युवर जबाबदारी आहे. ती निश्चीतपणे व प्रभावीपणे पारपाडण्यात येईल”.
– अँड. अजय मिसर, विशेष सरकारी वकील
Nashik Advocate Ajay Misar Mumbai Bomb Blast Case