नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महापालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनिता धनगर यांच्या घरी मोठे घबाड सापडल्यानंतर आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तिच्या बँक खात्याकडे होरा वळवला आहे. यातील स्टेट बँकेच्या एका खात्यात एसीबीला १२ लाख ७१ हजार रुपयांची रक्कम आढळून आली आहे. आता एसीबीने धनगरच्या अन्य बँक खात्यांची चौकशी हातात घेतली आहे.
नाशिक महापालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर हिचे उंटवाडी परिसरात आलिशान घर आहे. सिटी सेंटर मॉल सिग्नल जवळील रचित सनशाईन या बिल्डींगमध्ये तिचा आलिशान फ्लॅट आहे. याच आलिशान घराची एसीबीने झाडाझडती घेतली. याच घरात एसीबीच्या हाती मोठे घबाड घेतले. धनगरकडे तब्बल ८५ लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आली. विशेष म्हणजे ही रक्कम मोजण्यासाठी एसीबीला नोटा मोजण्याचे मशिन मागवावे लागले. मोजणी अंती ते ८५ लाख रुपये निघाले. यात २ हजार रुपयांची एकही नोट आढळून आली नाही.
एसीबीच्या प्राथमिक तपासानुसार, धनगरच्या नावावर २ आलिशान फ्लॅट आणि १ रिकामा प्लॉट आहे. उंटवाडी परिसरातील राहत्या फ्लॅटचीच किंमत जवळपास दीड कोटी रुपये एवढी आहे. धनगरच्या घरी ३२ तोळे सोनेही सापडले आहे. त्यामुळे एसीबीने आता बँक खाते, लॉकर आणि अन्य मालमत्तांची शोधाशोध सुरू केली आहे.
एसीबीने रविवारच्या दिवशी धनगर हिच्या स्टेट बँक खात्याची झडती घेतली. या बँक खात्यात एसीबीला १२ लाख ७१ हजार रुपयांची रक्कम आढळून आली आहे. आज बहुतेक बँक बंद असल्याने एसीबीला बँक खात्यातील रकमेचा तपशील मिळून आला नाही. त्यामुळे एसीबीचे पथक आता सोमवारी, ५ जून रोजी अन्य बँक खाते आणि लॉकर्स यांचा अधिक तपास केला जाणार आहे.
तब्बल ७६ सापळे, ११२ जेरबंद
यंदा जानेवारीपासून मे महिन्यापर्यंत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जोरदार कारवाई केली आहे. त्यामुळेच नाशिक एसीबी हे महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे. नाशिक एसीबीने गेल्या ५ महिन्यातच तब्बल ७६ सापळ्यात ११२ जणांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच सहकार विभागाचे उपनिबंधक सतीश खरे याला ३० लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. आता सुनीता धनगर हिच्यावर कारवाई झाली आहे.
Nashik ACB Bribe Sunita Dhangar SBI Account