नांदेड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जिल्हा परिषद व अभंग पुस्तकालय यांच्या संयुक्त विद्यमाने फिरत्या वाचनालयाचा शुभारंभ आज पालकमंत्री मंत्री गिरष महाजन यांनी हिरवी झेंडी दाखवून केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झालेल्या या समारंभास माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा सदस्य अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, आमदार अमर राजुरकर, आमदार भीमराव केराम, आमदार राजेश पवार, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय माळोदे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम कदम, शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ. सविता बिरगे, उपशिक्षणाधिकारी माधव सलगर, उपशिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, उपशिक्षणाधिकारी बंडू आमदुरकर, प्रविण साले यांची उपस्थित होती.
नांदेड जिल्ह्यातील 75 जिल्हा परिषद शाळांमध्ये फिरते वाचनालय हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जात आहे. या माध्यमातून प्रत्येक तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये हे फिरते वाचनालय एका पुस्तकाची संपूर्ण माहिती व परिचय करून देणार आहे. दिवसभर थांबून शाळेतील विद्यार्थ्यांना 75 पुस्तके ज्यामध्ये शैक्षणिक, वैचारिक, सामाजिक बांधिलकी, स्पर्धा परीक्षा विषयक, वैज्ञानिक विषयक, थोर हुतात्मे, स्वातंत्र्यसैनिक, भारतीय संविधान, थोर राष्ट्रीय नेते, पर्यटन विषयक तसेच राष्ट्रीय क्रांतिकारक आदी विषयांची पुस्तके वाचण्याची संधी विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे.
बाल वयातच विद्यार्थ्यांना विविध चरित्र संपन्न व्यक्तींचे ग्रंथ वाचण्यात आले तर त्याच्या जीवनामध्ये आमुलाग्र बदल घडतो. यासोबतच विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवणे महत्त्वाचे आहे असे उद्गार पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी काढले. नांदेड जिल्हा परिषद राबवत असलेल्या या उपक्रमाबद्दल त्यांनी कौतुक केले. याप्रसंगी या उपक्रमाची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांनी दिली. अभंग पुस्तकालयाचे उमेश कस्तुरे यांनीही याबाबतची माहिती सर्व उपस्थितांना करून दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश कुलकर्णी, प्रलोभ कुलकर्णी, सुधीर शिंदे यांनी परीश्रम घेतले.
Nanded ZP School Innovative Project
Education Mobile Library Books