इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या दिलखेचक नृत्याने प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. नृत्यासोबतच उत्तम अभिनयासाठी देखील ती ओळखली जाते. मराठीतील सिनेसृष्टीतील सध्याची आघाडीची अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. अमृताने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, मालिका, वेबसीरीजमध्ये काम केले आहे. सध्या अमृता ‘झलक दिखला जा’ या डान्स रिऍलिटी शो मध्ये सहभागी झाली आहे.
नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. याच महिन्यात अमृताचा वाढदिवस असतो. याच निमित्ताने तिने एक पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अमृताने पती हिमांशू मल्होत्राबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा उल्लेख केला आहे. २३ नोव्हेंबरला अमृताचा वाढदिवस असतो. तिच्या या पोस्टमध्ये तिने वाढदिवसाच्या महिन्याबद्दलच सांगितले आहे.
”वाढदिवस एवढा स्पेशल असतो, याची मला कधीच कल्पना नव्हती. पण तू भेटलास, आणि एखादा इव्हेंट कसा साजरा करावा, हे शिकवलंस. तू मला नेहमीच स्पेशल फील करून देतोस. पण या वाढदिवसाच्या महिन्यात तर २३ दिवस तू माझ्यासाठी स्पेशल करतोस. जर कोणी मला वाढदिवसाच्या आठवणींबद्दल विचारलं तर माझ्या मनात पहिल्यांदा तुझाच विचार येतो. तुझ्याशिवाय माझा वाढदिवस कधीच परिपूर्ण नव्हता, नाही आणि नसेल”, अशी भावनिक पोस्ट अमृताने या निमित्ताने केली आहे.
अमृता खानविलकरचा जन्म २३ नोव्हेंबर १९८४ रोजी झाला. अमृता खानविलकरची प्रमुख भूमिका असलेला ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी चांगलाच गाजला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड ब्रेक केले. विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती.
Actress Amruta Khanvilkar Husband Post
Entertainment