नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई – एरवी वर्षभर सूत जुळवून घेणाऱ्या राजकीय पक्षांच्या आघाड्यांना निवडणुकीच्या जागा वाटपांनाच सुरूंग लागतो. सध्या शिंदे-फडणवीस सरकार असो वा महाविकास आघाडी असो, दोन्हींकडे सारखीच समस्या आहे. जागावाटपावरून भाजप आणि शिंदे गटात धुसफूस सुरू आहे, त्यात आता शिक्षक मतदारसंघाच्या नागपूरच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत उभी फूट पडण्याची चिन्हे दिसत आहेत.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी मुंबईत झालेल्या बैठकीत शिक्षक मतदारसंघाची नागपूरची जागा शिवनेसेसाठी सोडली. नागपूरमधून शिवसेनेचा उमेदवार घोषित करण्यासंदर्भात तयारी सुरू झाली. तोपर्यंत कुणीच काही बोलले नाही. पण शिवसेना ठाकरे गटाकडून गंगाधर नाकाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश इटकेलवार यांनीही उमेदवारी दाखल केली. एवढा धक्का पुरेसा नव्हता की, काँग्रेस समर्थित शिक्षक संघटनांच्या दोन उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे कुणीही मागे हटायला तयार नाही.
काँग्रेस समर्थित शिक्षक संघटनांमध्ये विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ आणि शिक्षक भारतीचा समावेश आहे. त्यांचे नेतृत्व करणारे राजेंद्र झाडे आणि सुधाकर अडबाले यांनी कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, असे स्पष्ट केले. काँग्रेसने आम्हाला समर्थन देण्याचे आश्वासन दिले होते, त्यामुळे आघाडीतील इतर कुठल्या पक्षाच्या उमेदवारीशी आम्हाला काहीच घेणेदेणे नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
काँग्रेसची कसरत
शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे काँग्रेसला काय होत आहे, हेच कळेनासे झाले होते. त्यातून मार्ग निघेल, असा विश्वासही होता. पण आता काँग्रेस समर्थित शिक्षक संघटनांनी दंड थोपटल्यामुळे काँग्रेसची पंचाईत पडली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र मधला मार्ग काढण्याची कसरत सुरू केली आहे.
Nagpur Teachers Constituency Mahalliance Dispute Politics
Vidhan Parishad Congress Shivsena Thackeray