मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गानंतर आता महाराष्ट्रात आणखी काही एक्स्प्रेस-वेच्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. या नव्या महामार्गांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कंबर कसली असून आता निविदांवर संपूर्ण लक्ष आहे. सध्या दोन एक्स्प्रेस-वे सरकारच्या अजेंड्यावर आहेत आणि त्याच्या डीपीआरसाठी तीन निविदा प्राप्त झाल्या आहेत.
नागपूर-गोवा एक्स्प्रेस-वे आणि पुणे-नाशिक एक्स्प्रेस-वेचा डीपीआर तयार करण्याकरिता कन्सल्टन्ट नेमण्यासाठी सरकारने निविदा काढल्या होत्या. यात तीन कंपन्यांनी निविदा दाखल केल्या आहेत. ऑक्टोबर २०२२ मध्ये एमएसआरडीसीने कन्सल्टन्ट नेमण्याकरिता निविदा काढल्या होत्या. यात संबंधित कंपनीकडून सरकारला अभ्यास अहवाल, डीपीआर आणि भूमीअधिग्रहणापासून महामार्ग हस्तांतरणापर्यंत सहयोगी संस्था म्हणून कामं अपेक्षित होती.
नागपूर-गोवा एक्स्प्रेसवेला शक्तीपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले आहे तर नाशिक-पुणे एक्स्प्रेसवेला औद्योगिक महामार्ग असे नाव देण्यात आले आहे. नागपूर-गोवा महामार्ग ७६० किलोमीटरचा असून नाशिक-पुणे एक्स्प्रेसवे १८० किलोमीटरचा आहे. नागपूर-गोवा महामार्ग हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या मार्गाने कोकण व गोव्यात दाखल होईल. तर नाशिक-पुणे महामार्ग अहमदनगर व पुणे मार्गे मुंबईत दाखल होईल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भूमीअधिग्रहण होणार आहे. यासाठी संबंधित कंपनीकडून मोठ्या कामाची सरकारला अपेक्षा असणार आहे.
यांच्या आहेत निविदा
दोन्ही महामार्गांसाठी काढण्यात आलेल्या निविदांमध्ये तीन कंपन्या स्पर्धेत आहेत. यात एल.एन. मालवीय इन्फ्रा प्रोजेक्ट्स, मोनार्च सर्व्हेयर्स अँड इंजिनियरींग कन्सल्टन्ट आणि एसए. इन्फ्रास्ट्रक्चर कन्सल्टन्ट यांचा समावेश आहे. आता यांच्यापैकी कोणत्या कंपनीला निविदा वाटप करण्यात येईल, हे येत्या काही दिवसांतच कळेल.
Nagpur Goa Nashik Pune Expressway DPR Companies
Highway Infrastructure Transport Development