नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांद्याला भाव मिळत नसल्याने नाफेडद्वारे खरेदी सुरू करण्यात आली होती. मात्र, आता नाफेडनेही खरेदी थांबविल्याने बळीराजा हवालदिला झाला आहे. कांद्याने केलेल्या वांद्यामुळे मोठ्या आर्थिक संकटातून शेतकरी जात आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेर लासलगाव येथील नाफेडच्या शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या केंद्रावर लाल कांदा खरेदी सुरु होती. ती अचानक बंद करण्यात आली आहे. शुक्रवारी जास्तीजास्त ११४१ रुपयांवर असलेले दर आज ८५१ रुपयांपर्यंत दर घसरले आहे. गेल्या आठवड्यातील शुक्रवार च्या तुलनेत आज जास्तीत जास्त दरात ३०० रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
साधारणपणे कांद्याचे दर हे दोनशे ते चारशे रुपयांपर्यंत कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान नाफेड मार्फत लाल कांद्याची प्रथमच खरेदी सुरू झाली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली होती. त्यानुसार गेल्या आठवड्यातील शुक्रवार पर्यंत बारा हजार मॅट्रिक टन कांद्याची खरेदी साडेतीन हजार शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. मात्र, अधिवेशन संपताच सुरू असलेली लाल कांद्याची खरेदी ही बंद करण्यात आली आहे.
कांद्याची पंढरी म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. त्यात मागील काही महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी परवड निर्माण झाली आहे. त्यात आता पुन्हा नाफेडपासून सुरू केलेली कांद्याची खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुर पाहायला मिळत आहे.
Nafed Onion Purchasing Farmers Rates APMC Market