मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऐन दिवाळीत भाडेवाढ जाहीर करुन एसटी महामंडळाने प्रवाशांना चांगलाच दणका दिला आहे. एसटी महामंडळाने दिवाळी सण लक्षात घेता प्रवास भाड्यात ५ ते ७५ रुपयांपर्यंतची हंगामी दरवाढ केली आहे. त्याची घोषणा आज करण्यात आली आहे.
खासगी बसेस आणि रेल्वे यांचे आरक्षण फुल्ल झाल्यानंतर यंदा एसटी महामंडळाने विशेष बसची घोषणा केली आहे. त्यातच आता महामंडळाने तिकीटाचे दरही वाढविले आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्याचा चांगलाच फटका बसणार आहे. महसूल वाढीसाठी आणि हंगामी स्वरुपाची ही वाढ असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे. २० ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत ही भाडेवाढ लागू राहणार आहे. तर, शिवनेरी आणि अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही. परिणामी, साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) आणि एसी बसेसला ही दरवाढ लागू असणार आहे. ही भाडेवाढ एसटीच्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक, त्रैमासिक आणि विद्यार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही. 1 नोव्हेबरपासून नेहमीप्रमाणे एसटीचे तिकीट दर आकारले जाणार आहेत.
त्या प्रवाशांना फरक द्यावा लागेल
ज्या प्रवाशांनी २० ते ३१ ऑक्टोबर दरम्यानच्या प्रवासाचे एसटीचे आरक्षण केले आहे त्या प्रवाशांकडून आरक्षण तिकीट दर आणि नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येणार आहे. तसे एसटी महामंडळाने सांगितले आहे.
असे असतील तिकीट दर (रुपये)
सध्याचे दर आणि दिवाळीतील दर
मुंबई ते नाशिक- साधी गाडी ४०० (४४५). शिवशाही- ५९५ (६५५)
मुंबई ते औरंगाबाद- साधी गाडी ८६० (९५०), शिवशाही १२८० (१४१०)
मुंबई ते कोल्हापूर – साधी गाडी ५६५ (६२५) शिवशाही ८४० (९२५)
दादर ते स्वारगेट – साधी गाडी २३५ (२६०), शिवशाही ३५० (३८५)
MSRTC ST Bus Travel Ticket Rate Increase Diwali