नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सन २०१७ ते २०२० या कालावधीत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे. आता यांदर्भात नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
ही यादी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी ठिकाणी सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतील शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, कर्जखाते पासबुक व बचतखाते पासबुक घेऊन नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा बँकेच्या शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे. सन २०१७ – १८, २०१८ – १९ व २०१९ – २० या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांमध्ये पीक कर्जाची उचल करुन शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या विहित कालावधीत परतफेड केलेली आहे. अशा शेतकऱ्यांना शासनाकडून 50 हजार पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
यामध्ये प्राथमिकदृष्ट्या पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्धीसाठी बँकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या यादीमधील संबंधित शेतकऱ्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या विशिष्ट क्रमांकासह शेतकऱ्यांनी बँक कर्ज पासबुक व आधार कार्ड घेऊन बँकेच्या शाखेमध्ये अथवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये आधार प्रमाणीकरणासाठी जावयाचे आहे. त्याठिकाणी संगणकावर दिसत असलेल्या कर्जखात्यांचा तपशील, आधार क्रमांक इत्यादी बाबींची खातरजमा करुन शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करावयाचे आहे. आधार प्रमाणीकरणानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक बचत खात्यामध्ये थेट प्रोत्साहनपर लाभाची रक्कम वर्ग करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
ज्या शेतकऱ्यांनी बँक कर्ज खात्यास आधार क्रमांक उपलब्ध करुन दिलेला नाही. अशा शेतकऱ्यांची नावे पूर्तता झाल्यानंतर समाविष्ट करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे ज्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये निवडणूक आचारसंहिता लागू आहे अशा गावातील पात्र शेतकऱ्यांची नावे या यादीमध्ये आचार संहिता संपल्यानंतर समाविष्ट केली जाणार आहेत.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०१९ अंतर्गत नियमित कर्ज परतफेड करण्याऱ्या शेतकऱ्यास कमाल रू.५०हजार प्रोत्साहनपर लाभ देण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. त्याचा लाभ शेतकरी वर्गास दिवाळीपुर्वी देणेचे अनुषंगाने शासनाकडुन पात्र लाभार्थीची यादी बॅंकनिहाय प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी वर्गास आवाहन करण्यात येते की,त्यांनी आपले बॅंक खाते ज्या बॅकेत आहे त्या बॅंक शाखेत तसेच आपले सरकार केंद्रात जाऊन आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे.
– गंगाथरन डी. जिल्हाधिकारी , नाशिक
Farmers 50 Thousand Rupees Aid Nashik Collector