नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रहार संघटनेचे प्रमुख आणि शिंदे गटाचे समर्थक बच्चू कडू यांनी खोक्यांवरुन होणाऱ्या आरोपांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भाजपचे आमदार रवी राणा यांनीही कडू यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे कडू यांनी राणा यांना थेट आव्हान दिले आहे की, आम्ही खोके घेतले हे १ तारखेपर्यंत सिद्ध करा अन्यथा आम्ही मोठा निर्णय घेऊ. तसेच, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राणा यांच्या वक्तव्यांची दखल घ्यावी, असेही कडू यांनी म्हटले आहे. यासंदर्भात आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते आज नाशिक दौऱ्यावर होते.
केसरकर म्हणाले की, शेतीच्या नुकसानीची सरकारने दखल घेतली आहे. त्यामुळेच या नुकसानीचे पंचनामे सॅटेलाईटने होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने जनतेसाठी काय केले? कुमासाठी आणि काय भांडलेत? माझा पक्ष म्हणजे महाराष्ट्र असे नसतं, असे म्हणून चालत नाही. त्यांचे ९० टक्के सध्या राजकारण सुरू आहे. चार महिन्यांनी त्यांना कळालं की पूर आला. शेतकरी बाधित झाला. शेतकऱ्यांना मदतीचे ५० हजार कधी दिले नाही. उद्धव ठाकरेंबद्दल आदर आहे पण सत्तेत असतांना त्यांनी मंजूर असलेले ५० हजार शेतकऱ्यांना दिले नाहीत. ते आमच्या सरकारने तातडीने दिले. लोकांची दिशाभूल त्यांनी करू नये.
बच्चू कडू यांच्याबाबत केसरकर म्हणाले की, ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे दोन आमदार आहेत. लवकरच ते मंत्री पदी दिसतील अशी अपेक्षा आहे. त्यांनी संयम ठेवावा. मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होईल त्यात त्यांना संधी मिळण्याची अपेक्षा आहे, असे केसरकर म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. याचा अर्थ युती होईल असे नाही. युती झाली तर शिंदे साहेब घोषणा करतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Minister Deepak Kesarkar on Bacchu Kadu Politics