मुंबई – महाराष्ट्र विधान परिषदेच्या सहा जागांसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यात धुळे-नंदुरबार, मुंबईतील दोन, कोल्हापूर, नागपूर, अकोला-बुलडाणा-वाशिम या जागांचा समावेश आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या या सहा जागांची मुदत येत्या मुदत 1 जानेवारी, 2022 रोजी पुर्ण होत आहे. त्यात सध्या धुळे-नंदुरबार मध्ये अमरिशभाई पटेल, मुंबईत काँग्रेसचे भाई जगताप आणि शिवसेनेचे रामदास कदम, कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे सतेज पाटील, नागपूरमध्ये भाजपचे गिरीश व्यास, अकोला-बुलडाणा-वाशिम येथे शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया हे आमदार आहेत. या रिक्त होणा-या जागेकरिता भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला असून आजपासून आचार संहिता लागू झाली आहे.
या निवडणूकीची अधिसूचना मंगळवार, दि. 16 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिवस दि. 23 नोव्हेंबर (मंगळवार) 2021 आहे. दि.24 नोव्हेंबर 2021 रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस शुक्रवार, दि. 26 नोव्हेंबर,2021 असा आहे.
या मतदार संघांसाठी शुक्रवार, दिनांक 10 डिसेंबर, 2021 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. मंगळवार, 14 डिसेंबर, 2021 रोजी मतमोजणी होणार असून गुरुवार, 16 डिसेंबर, 2021 पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे.
भारत निवडणूक आयोगाने कोविड-19 संदर्भातील विस्तृत मार्गदर्शक तत्त्वे तसेच यासंदर्भात अलीकडेच दिनांक 28 सप्टेंबर 2021 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकान्वये जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक राहील. या मार्गदर्शक सूचना https://eci.gov.in/candidate-political-parties/instructions-on-covid-१९/. संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
दरम्यान, सोलापूर आणि अहमदनगर या दोन ठिकाणची निवडणूक होणार आहे. या दोन्ही जागांची मुदतही जानेवारीतच संपत आहे. मात्र, ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.