अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारे वाघदर्डी धरण आज दुपारी ६८.३ फूट पातळी होताच ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे समस्त मनमाडकरांचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न तुर्तास तरी सुटला आहे.सलग चौथ्या वर्षी वाघदर्डी धरण ओव्हरफ्लोच्या झाले आहे. दरवर्षी गणेशोत्सवा नंतर धरण भरते. पण यंदा धुवाँधार पावसामुळे गणेश उत्सव व स्वातंत्रदिनाच्या पूर्व संध्येलाच धरण ओव्हरफ्लो झाले.
सध्याच्या १४ ते १५ दिवसांआड मानमाडकर जनतेला पाणी वितरण होते. धरण भरल्याने किमान आठवड्यातून २ दिवस पाणी मिळावे अशी अपेक्षा असली तरी सदोष वितरण व्यवस्थेमुळे दररोज पाणी हे मनमाडकरांचे तरी स्वप्नच राहणार आहे. आताही धरणात पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे सांडव्यावरून नदी पात्रात पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता आहे. धरण भरल्याचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी मनमाडकरांनी धरणावर धाव घेतली आहे.