पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधला. या वर्षातील हा अखेरचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी पुण्यातील एका संस्थेचे तोंडभरुन कौतुक केले. ती संस्था म्हणजे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर होय. पुस्तकांसंदर्भात ही संस्था अतिशय मोलाचे योगदान देत आहे. ते वाखाणण्याजोगे आहे, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी त्यांच्या भाषणात म्हणाले की,
मित्रांनो, पुस्तकं -ग्रंथ काही फक्त ज्ञान देतात असं नाही तर व्यक्तिमत्व घडवण्याचं, आयुष्य घडवण्याचंही काम करतात, पुस्तक वाचण्याच्या छंदामुळं एका अवर्णनीय आनंदाची अनुभूती मिळते. आजकल मी पाहतो की, अनेक लोक आपण यावर्षी किती पुस्तकं वाचली हे अतिशय अभिमानानं सांगत असतात. तसंच आता यापुढे मला अमूक पुस्तकं वाचायची आहेत, असंही सांगतात. हा एक चांगला कल आहे आणि तो वाढला पाहिजे.
मी ही ‘मन की बात’च्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही या वर्षात वाचलेल्या, आपल्याला आवडलेल्या पाच पुस्तकांविषयी सांगावं. यामुळे 2022मध्ये इतर वाचकांना चांगली पुस्तकं निवडण्यासाठी तुमची मदत होऊ शकेल. सध्याच्या काळामध्ये आपला ‘स्क्रिन टाइम’ थोडा जास्तच वाढतोय, त्यामुळे पुस्तक वाचन जास्तीत जास्त लोकप्रिय बनलं पाहिजे, यासाठीही आपण सर्वांनी मिळून, एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत.
https://twitter.com/PBNS_India/status/1474980643440263170?s=20
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
अलिकडेच माझं लक्ष एका संस्थेनं सुरू केलेल्या वेगळ्या प्रयत्नाकडे वेधलं गेलं. हा प्रयत्न आपल्या प्राचीन ग्रंथांना आणि सांस्कृतिक मूल्यांना केवळ भारतामध्येच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये लोकप्रिय बनविण्यासाठी केला गेला आहे. पुण्यामध्ये भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर ही संस्था आहे. या संशोधन केंद्रामार्फत इतर देशांच्या लोकांना महाभारताच्या महत्वाविषयी परिचय करून देण्यासाठी ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केला आहे. तुम्हा लोकांना जाणून आश्चर्य वाटेल, हा अभ्यासक्रम अलिकडेच सुरू झालाय, मात्र यामध्ये जो अभ्यासक्रम शिकवला जातोय, तो तयार करण्याला प्रारंभ तर 100 वर्षांपूर्वी झाला होता. ज्यावेळी भांडारकर संस्थेने यासंबंधित अभ्यासक्रम सुरू केला, त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. या अभिनव उपक्रमाविषयी मी इथं चर्चा करतोय, याचं कारण म्हणजे, लोकांना समजलं पाहिजे की, आपल्या परंपरेमधले वेगवेगळे पैलू कशाप्रकारे आधुनिक पद्धतीने प्रस्तुत केले जात आहेत. सातासमुद्रापल्याडच्या लोकांपर्यंत त्याचा लाभ कसा मिळू शकेल, यासाठीही नवोन्मेषी कल्पना, प्रत्यक्षात आणल्या जात आहेत.