मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धारधार शस्त्रांनी हल्ला करत दोन जणांनी एका तरुणाची हत्या केली आहे. गोल्डन नगर भागातील हॉटेल शकीलजवळ ही घटना घडली आहे. हा खून पूर्व वैमन्यास्यातून कुरापत काढत झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे. या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान अहमद सलीम अहमद (वय २८, रा. बागे महमूद जलकुंभाजवळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास तौसीफ अहमद जब्बार अहमद आणि त्याचा साथीदार अकील अहमद मोहम्मद सुगराती या दोघांनी मागील भांडणाची कुरापत काढून सलमानवर धारदार शस्त्रांनी वार केले. सलमानच्या पोटावर, पाठीवर, मानेवर आणि चेहऱ्यावर सपासप वार करण्यात आले. त्यामुळे सलमान रक्ताच्या थारोळ्यात पडला. हल्ला मोठा असल्याने तो जागीच गतप्राण झाला. त्यानंतर तौसिफ व अकीलने घटनास्थळावरून पलायन केले.
माहिती मिळताच पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोर दुचाकीवरून फरार झाल्याचे समजताच सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली. तौसिफ आणि अकील मनमाडकडे पळाल्याचे समजताच पोलिसांचे पथक मनमाडला गेले. तौसिफ आणि अकील हे स्टेशनवर रेल्वेने पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. त्याचवेळी या दोघांना पोलिसांनी पकडले. हल्लेखोरांना न्यायालयाने १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Malegaon Crime Youth Murder 2 Arrested