मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव स्फोट प्रकरणातील आणखी एक साक्षीदार फितूर झाला आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) विनंतीवरून न्यायालयाने या साक्षीदाराला फितूर घोषित केले आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील फितुरांची संख्या ३७ झाली आहे.
मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाशी संबंधित सुनावणीत सर्वाधिक कुठली गोष्ट आजपर्यंत गाजली असेल तर ती फितुरांची आहे. सुरुवातीला आरोपीला ओळखत असल्याची किंवा प्रकरणाबद्दल माहिती असल्याचे सांगणारे साक्षीदार ऐनवेळी फितूर होत आले. त्यामुळेच एवढ्या वर्षांच्या सुनावणीत आतापर्यंत ३७ साक्षीदारांना फितूर ठरविण्यात आले.
या प्रकरणातील मुख्य आरोपी व भारतीय जनता पार्टीच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना चांगल्याप्रकारे ओळखणाऱ्या साक्षीदारांने आपण त्यांना ओळखत नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्याला फितूर ठरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे एटीएसने यापूर्वी या साक्षीदाराचा जवाब नोंदविला होता. त्यावेळी त्याने आपण प्रज्ञा सिंह ठाकूर यांना ओळखत असल्याचे सांगितले होते. एवढेच नाही तर त्यांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये आपण सहभागी झालो होतो, असेही तो म्हणाला होता.
याशिवाय प्रज्ञा सिंह ठाकूर आणि फरार आरोपी रामजी कालसंग्रा यांच्यात स्फोटानंतर झालेले संभाषण आपण ऐकले आहे, असेही त्याने सांगितले होते. यामध्ये दोघेही स्फोटासाठी वापरण्यात आलेली प्रज्ञा सिंह ठाकूर यांची दुचाकी आणि शक्तीशाली स्फोट घडवण्यात अयशस्वी ठरल्याचे बोलत होते, असेही त्याने म्हटले होते. परंतु, आता त्याने आपण प्रज्ञा सिंह ठाकूर यांना ओळखत नसल्याचे म्हटले आहे.
स्वेच्छेने साक्ष नाही
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि कालसंग्रा यांना ओळखत नसल्याचे संबंधित साक्षीदाराने बुधवारी सांगितले. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी साक्षीदाराने आपण स्वेच्छेने साक्ष जबाब दिला नाही, असेही न्यायालयाला सांगितले. त्यानंतर एटीएसनेच त्याला फितूर घोषित करण्याची विनंती केली आणि न्यायालयाने त्याला फितूर जाहीर केले.
Malegaon Bomb Blast Case Witness Twist