मकर संक्रांत
नेहमीप्रमाणे यंदाही १४ जानेवारी रोजी मकर संक्रांत साजरी होणार आहे. यादिवशी सूर्य हा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या दिवसाला सूर्याचे मकर संक्रमण असे म्हटले जाते. या दिवसापासून दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. उत्तरायणाच्या प्रथम दिवसाला विशेष महत्त्व असल्याने पितामह भीष्म यांनी कौरव-पांडव युद्धात अनेक दिवस युद्ध स्थळावर शरपंजरी पडले. भीष्म यांनी संक्रांतीच्या दिवशीच आपला प्राण सोडला होता.
धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देव आपला पुत्र शनिच्या भेटीस जातात. संक्रांतीच्या दिवशी नदी स्नान त्याचप्रमाणे गणेश, शंकर, विष्णू आणि लक्ष्मी यांच्या पूजनास विशेष महत्त्व आहे. या दिवशी वस्त्रदान, पात्र दान, तिळगुळ दान, उबदार कपडे व खिचडी दान, यास विशेष महत्त्व आहे
संक्रांत विशेष
यावेळच्या संक्रांतीचे वैशिष्ट्य म्हणजे संक्रांतीचे वाहन सिंह असून उपवाहन घोडा आहे. ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे. नैऋत्य दिशेकडे बघत आहे. तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. ती गदाधारी आहे. केशराचा टिळा लावला आहे. सुवासासाठी जाईचे फुल हाती घेतले आहे. ती उभ्या अवस्थेत असून चांदीचे पात्र हाती घेतलेले आहे. तसेच आभूषण म्हणून कंकण धारण केलेले आहे .
संक्रांती मुहूर्त
14 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजून 12 मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. या दिवशीचा पूजा काल 02:12 पासून 5.40 पर्यंत आहे. तर महा पुण्यकाल 02:12 पासून 02:36 पर्यंत आहे….
हळदी कुंकू समारंभ
मकर संक्रांतीच्या दिवसापासून महिलांचे हळदी-कुंकू समारंभ सुरू होतात. यात कुठलाही खंड पडत नाही. सर्व महिला उत्साहाने हा समारंभ करतात. वस्तूचीही देवाणघेवाण करतात. यंदा रथसप्तमीच्या दिवसापर्यंत म्हणजेच 7 फेब्रुवारी पर्यंत हळदी-कुंकू समारंभ चालणार आहेत.
सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला