इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – झी मराठी वाहिनी ही त्यावरील दर्जेदार मालिकांसाठी ओळखली जाते. आजवर अनेक सुंदर मालिकांची भेट या वाहिनीने प्रेक्षकांना दिली. त्यामुळेच ही प्रेक्षकांसाठी आवडती वाहिनी आहे. सध्या देखील झी मराठीवर अनेक दर्जेदार मालिका सुरू आहेत. या सर्वच मालिका या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. त्यातही प्रेक्षकांच्या विशेष आवडीची मालिका म्हणजे ‘माझी तुझी रेशीमगाठ’. प्रथितयश कलाकार असल्याने या मालिकेने अल्पावधीतच यशाचं शिखर गाठलं. प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे, संकर्षण कऱ्हाडे असे मोठे कलाकार या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहेत. मात्र, ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर परतलेला श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांची जोडी प्रेक्षकांना भावली. छोटी परी तर प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईतच बनली आहे. यश – नेहाच्या लग्नानंतर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार होती. मात्र प्रेक्षकांच्या प्रेमामुळे मालिका सुरू ठेवण्यात आली. त्यानंतर या मालिकेमध्ये नेहा आणि यशचा अपघात झाल्याचं दाखवण्यात आलं. मालिकेत मोठा ट्विस्ट आल्यानंतर प्रेक्षकांनी ‘माझी तुझी रेशीमगाठ’वर नाराजी व्यक्त केली. नेहा या पात्राने पुन्हा मालिकेत एण्ट्री केली असली तरी ती नेहा नसून अनुष्का आहे. आणि तिला आपल्या आयुष्यातील भूतकाळ आठवत नाहीये. त्यामुळे मालिकेच्या कथेला एक वेगळं वळण मिळालं. यावरही प्रेक्षकांनी कमेंट करत लवकरच सगळं सुरळीत होऊ दे, अशी मागणी केली होती.
https://twitter.com/zeemarathi/status/1609811024567500800?s=20&t=RjT3Llp1tmJa4nGAIob5AQ
आता प्रार्थनाने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे पोस्ट शेअर केल्याने ‘माझी तुझी रेशीमगाठ’ प्रेक्षकांचा निरोप घेणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. “काहीच दिवस बाकी” असं या मालिकेतील एक लूक शेअर करत प्रार्थनाने म्हटलं आहे. तर मालिका संपल्यानंतर तिचे काय प्लॅन आहेत हेही तिने सांगितलं आहे. मालिका संपल्यानंतर “सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र फक्त झोपणार” असं प्रार्थनाने म्हटलं आहे. ही पोस्ट शेअर करत मालिकेतील इतर कलाकारांनाही तिने टॅग केलं आहे. दरम्यान, प्रार्थनाची ही पोस्ट पाहिल्यानंतर “मी ही तुझ्या प्लॅनमध्ये सहभागी होणार” असं या मालिकेतील अभिनेत्री काजल काटेने म्हटलं आहे. पण खरंच ‘माझी तुझी रेशीमगाठ’ बंद होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अद्याप याबाबत कोणतीच अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
https://twitter.com/zeemarathi/status/1610163055991885824?s=20&t=RjT3Llp1tmJa4nGAIob5AQ
ही नवी मालिका येणार भेटीला
झी मराठीच्यावतीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. त्यानुसार, येत्या २३ जानेवारीपासून ‘३६ गुणी जोडी’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोमवार ते शनिवार सायंकाळी साडेसहा वाजता ही मालिका असणार आहे. म्हणजेच माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेच्या जागी ही मालिका असणार आहे. या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला नवी कोरी जोडी येणार आहे. मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे, “३६ गुण जुळले की जोडी जमते पण ३६ चा आकडा असणाऱ्या जोडीचं काय करायचं”, असा प्रश्न उपस्थित करीत हा प्रोमो शेअर केला आहे.
https://twitter.com/zeemarathi/status/1607722593871888384?s=20&t=RjT3Llp1tmJa4nGAIob5AQ
Majhi Tujhi Reshimgath TV Serial Farewell Soon
Zee Marathi Entertainment Show