नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जागतिक महिला दिनानिमित्त चांदवड तालुक्यातील भाटगाव नूतन विद्यालयाचे कलाशिक्षक देव हिरे यांनी फलक रेखाटन करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी हिरे यांनी सांगितले की, आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची आपली संस्कृती आहे. त्यातच भारतीय माणूस हा उत्सव प्रिय आहे. किंबहुना आपल्या आयुष्यातील महिलांप्रती आदर भावना व्यक्त करण्यासाठी एक संधी म्हणून हा दिवस महत्वपूर्ण आहे. आपल्या घरातील आई, बहीण, पत्नी, वहिनी, काकी, मावशी,आज्जी या सगळ्या महिलांसोबतच बाहेर शाळा, कॉलेज, ऑफिस इतर कार्यालयांत काम करणाऱ्या महिला प्रत्येक आघाडीवर वेगवेगळी झुंज देत असतात. कुणाचं समर्पण सिद्ध होतं तर कुणाचं समर्पण जाहीर होत नाही. आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण अंतर्मुख होऊया. तमाम महिलांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून काही मोजक्या शब्दांद्वारे आदरपूर्वक शुभेच्छा !