मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यभरात उद्या शनिवारी महाशिवरात्री साजरी होत आहे. मुंबईतील बाबुलनाथ मंदिर येथे महाशिवरात्री साजरी करण्याबाबत स्थानिक आमदार व राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयात मंदिर ट्रस्ट व भाविक प्रतिनिधींची बैठक झाली. यंदा महाशिवरात्रीला मंदिरातील शिवलींगावर बेल व फुल अर्पण करण्यासह जलाभिषेक करण्यास परवानगी देण्याचा सुवर्णमध्य या बैठकीमध्ये काढण्यात आला. बैठकीस मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नितीन ठक्कर, विश्वस्त प्रदीप श्रॉफ यांच्यासह भाविकांचे प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोना काळात मंदिरात पूजाविधीबाबत प्रतिबंध लावण्यात आले होते. तसेच आयआयटीच्या एका अहवालानुसार शिवलींगावर हळदी, कुंकू किंवा इतर पूजा साहित्य वाहिल्याने, चंदनाचा लेप लावल्याने शिवलींगाची झीज, नुकसान होत असल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. याबाबत भाविकांमधून पूजाविधी परत सुरु करण्याबाबत मागणी होती. या मुद्द्यावर स्थानिक आमदार व पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंदिर विश्वस्त व भाविक प्रतिनिधींची आज मंत्रालयात बैठक घेतली. महाशिवरात्रीला बेल व फुल अर्पण करण्यासह जलाभिषेक करण्यास परवानगी देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
मंत्री श्री. लोढा म्हणाले की, महाशिवरात्रीला बाबुलनाथ मंदिर येथे मंदिर विश्वस्तांसह पोलीस प्रशासन आदी सर्वजण भाविकांच्या मदतीसाठी असतील. भाविकांनी सहकार्य करावे. शिवलींगाची झीज, नुकसान होणार नाही यादृष्टीने काळजी घ्यावी. भाविकांच्या भावनाही महत्त्वाच्या आहेत. मंदिर आपल्या सर्वांचे आहे. त्याची सुरक्षाही आपली सर्वांची जबाबदारी आहे. सर्वांनी महाशिवरात्री उत्साहात साजरी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
Mahashivratri Flower Abhishek Permission in This Temple