पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एक एकर शेत असेल तरी बांध घालण्याची परंपरा आहे. आणि याच बांधावरून भावा-भावांमध्ये, मित्रांमध्ये, शेजाऱ्यांमध्ये तंटे होण्याचीही परंपरा आहे. बांध्यावरची प्रकरणं वर्षानुवर्षे न्यायालयात सुरू असल्याचे आपण बघतोय. पण महाराष्ट्रातील एका गावात १ लाख एकर शेतीला बांधच नाही. आणि बांधन नसलेल्या या शेतीचे कौतुक आजपर्यंत देशभर होत आले आहे.
शेतीवर बांध उभा करण्यावरून कित्येक लोक एकमेकांच्या जीवावर उठलेले आपण बघितले आहे. विथभर अंतर जरी वाढले किवा कमी झाले तर खास मित्रांमध्येही वैर निर्माण झाल्याचे आपण बघितले आहे. पण सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा गावाने एक वेगळाच आदर्श जगापुढे घालून दिला आहे. एक-दोन वर्षाची ही कहाणी नसून शेकडो वर्षांची परंपरा गावकरी पुढे नेत आहेत. या गावात शेतीला बांध न घालण्याची ही परंपरा खरं तर नव्या काळात आदर्श ठरावी अशीच आहे.
या गावातील कुठल्याही रस्त्याने जाताना तुम्ही शेताकडे बघितले तर तुम्हाला कुठेही बांध नजरेस पडणार नाही. विशेष म्हणजे शेतीचे मालक आपलं शेत लक्षात ठेवतील, पण बैलांना कसे कळत असेल, हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. या गावाचं हेच वैशिष्ट्य आहे. बैलांना देखील बांधाशिवाय असलेलं आपल्या मालकाचं शेत ओळखता येतं. एखाद्या शेतजमिनीचे दहा हिस्से झाले तरी दहा भावंडांमध्ये शिवारावरून कधीच वाद झाले नाहीत.
बांध टिकतच नाही म्हणून…
अनेकांनी सुरुवातीला बांध नसण्याला चमत्कार मानले. पण तसे काहीही नसून मंगळवेढ्यातील जमिनीला धर नसल्याने असे घडत असल्याचे सांगितले जाते. एक हलका पाऊस आला तरी बांध वाहून जातो. त्यामुळे शेतकरीही बांध बांधत नाहीत. फारच वेळ आली तर एखादा दगड, एखादे झुडूप यावरून शेतीचा बांध ठरवतात. पण कधीही एकमेकांशी बांध्यावरून भांडत नाहीत.
रात्री मुक्काम नाहीच
मंगळवेढ्यातील माती काळी आहे आणि संपूर्ण शेती पावसावर अवलंबून आहे. शेतात ना विहीर आहे ना बोअरवेल आहे. त्यामुळे इथे सकाळी आलेला शेतकरी आपली दिवसभराची खाण्या-पिण्याची व्यवस्था करतो. तो सकाळी शेतात येतो आणि सायंकाळी काम करून परत जातो. जमिनीला धर नसल्याने काळ्या मातीत साधं झोपडंही उभं करणं शक्य नाही.
Maharashtra Village Farm Land No Border
Agriculture